कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी
सातारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने गडभ्रमंती व स्वच्छता मोहिमेंतर्गत आता तळबीड (कराड) हद्दीतील वसंतगडाची निवड केली गेली आहे. रविवार, दि. 22 रोजी सकाळी 7 वाजता नागरिकांनीही उपस्थित राहावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी केले आहे.
‘आपले किल्ले आपली जबाबदारी’ या अंतर्गत पोलिस दलाच्या वतीने दर रविवारी जिल्ह्यातील एका किल्ल्यावर जाऊन तेथे स्वच्छता मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. याची सुरुवात किल्ले अजिंक्यतारा येथून झाली असून स्वतः पोलिस अधीक्षक समीर शेख यासाठी उपस्थित राहत आहेत. याशिवाय उपविभागातील सर्व पोलिस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी कुटुंबियांसह सहभागी होत आहेत. सर्वसामान्य नागरिकांनाही गड स्वच्छता मोहिमेत सहभागी होता येणार आहे. पोलिसांच्या या मोहिमेत सहभागी होण्यासाठी पोलिसांनी तयार केलेला गुगल फॉर्म भरायचा आहे.
या रविवारी सर्वांनी सकाळी सात वाजता सरसेनापती हंबीरराव मोहिते समाधी प्रांगण, किल्ले वसंतगड पायथा, तळबीड येथे जमायचे आहे. तेथून मोहिमेला सुरुवात होईल. साधारण दोन तास स्वच्छता मोहिम राबवल्यानंतर एक तास पोवाडा, गडाची माहिती दिली जाणार आहे. यासाठी परिसरातील नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन पोलिस दलाच्यावतीने करण्यात आले आहे.