कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांची नोकरी जाते का नवाब मलिकाचे मंत्रिपद जाते ते बघूया असा सूचक इशारा केंद्रीय रामदास आठवले यांनी दिला आहे. नवाब मलिक यांनी वानखेडेंची एक वर्षात नोकरी घालवणार असं वक्तव्य केले होते. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे.
कराड येथे आयोजित पत्रकार परिषेदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड, आप्पासाहेब गायकवाड यांच्यासह आरपीआय पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. रामदास आठवले म्हणाले, आर्यन खान प्रकरणात पक्षपातीपणा केला जातोय असं म्हणता येणार नाही. आरोप होतायत मात्र पुर्ण चौकशी केल्यानंतर आर्यन खानसह इतरांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणात 19 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. न्यायालयाने आर्यन खानचा जामीन फेटाळला आहे. याचा अर्थ असा की त्याच्या विरोधात NCB कडे सबळ पुरावा आहे. त्यामुळे आरोप करणे योग्य नाही.
सुशांत सिंग प्रकरणानंतर फिल्म इंडट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा पुरवठा होतोय हे सिध्द झाले आहे. त्यामुळे पक्षपाती केला जातोय असं म्हणणे योग्य ठरणार नाही. जी माहिती मिळतेय त्याप्रमाणे कारवाई केली जातेय. कारवाई योग्य नसती तर कोर्टाने आतापर्यंत सरकार व अधिकाऱ्यांवर ताशेरे अोढले असते, तेव्हा यावर राजकारण करू नये. एनसीबी स्वतंत्र यंत्रणा आहे, त्यामुळे त्याचे ते काम करत आहेत असे रामदास आठवले म्हणाले.