विशेष प्रतिनिधी । मयुर डुमणे
‘मी पुन्हा येईन’ असं देवेंद्र फडणवीस म्हणत असतानाच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा अनपेक्षित निकाल लागला. आणि ‘सत्ता स्थापन करणारच’ असा आत्मविश्वास असणाऱ्या भाजपा , अर्थातच ‘महायुती’ला मोठा धक्का बसला. मुख्यमंत्री पदावरून बिनसल्याने ‘महायुती’मधील दोन बडे पक्ष असलेल्या भाजपा आणि शिवसेना दोघांनी देखील एकमेकांसोबत काडीमोड घेतला. याचा परिणाम म्हणून देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याची इच्छा लोप पावली. आता आपल्या लाडक्या माजी मुख्यमंत्र्यासाठी त्यांच्याच एका चाहत्याने पत्र लिहिले आहे. मयूर डुमणे असे पत्र लिहिणाऱ्या चाहत्याचं नाव आहे. नक्की काय आहे पत्र जरा वाचाचं..
प्रिय देवेंद्रजी,
तुम्ही मुख्यमंत्री पदी नसणार हे वास्तव अजूनही माझं मन स्वीकारत नाही. काय केलं नाही तुम्ही महाराष्ट्रासाठी. गेली पाच वर्षे अहोरात्र तुम्ही महाराष्ट्रासाठी झिजलात. सातत्याने वाढणाऱ्या पोटाकडे दुर्लक्ष करत तुम्ही अहोरात्र अभ्यास केला. कोणताही निर्णय घेताना तुम्ही घाई केली नाही. तुमचा अभ्यास सुरू असल्याचा संबंध महाराष्ट्राने पाहिले. आज गुगलवर अभ्यास असा शब्द सर्च केल्यास गुगलसुद्धा तुमचेच चित्र दाखवते. महाराष्ट्राच्या इतिहासात तुमच्या इतका अभ्यासू मुख्यमंत्री मी पाहिला नाही. मुख्यमंत्री पदावर असणाऱ्या व्यक्तीला खूप अभ्यास करावा लागतो हे तुमच्यामुळे महाराष्ट्राला कळाले. गेली पाच वर्षे तुम्ही महाराष्ट्राचा कारभार सक्षमपणे हाकला. सक्षमपणे कारभार केल्यानंतर तुम्ही पुन्हा येण्यास सज्ज झालात. महाराष्ट्राचा कारभार हाकत असताना तुमच्यामुळे अमृता वहिणींच्या प्रतिभेला चालना मिळाली आणि वहिणींच्या रूपाने एक गोड गायिका महाराष्ट्राला मिळाली. त्यांची ती ‘तिर ऐसा लगा, दर्द ऐसा हुआ’ हे गाणं म्हणत असताना केलेली action घायाळ करून गेली. महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने तुम्ही महाराष्ट्रभर फिरलात. ‘मी पुन्हा येईन’ अशी त्रिवार गर्जना तुम्ही महाजनादेश यात्रेच्या सभेत केली. त्या घोषणेने महाराष्ट्र हादरून गेला आणि आपला पुढील मुख्यमंत्री तुम्हीच असणार हे जनतेने निश्चित केले. निवडणुकीत तुम्ही ज्या आत्मविश्वासाने लढत होता त्याला तोड नाही. तुम्ही तेल लावून कुस्तीसाठी तयार होता पण समोर कोणी पैलवान नव्हता. जाणते राजे शरद पवार सुद्धा तुमच्या या धडाकेबाज प्रचाराला घाबरले. पवारांचं राजकारण संपलंय अस तुम्ही एका मुलाखतीत म्हणाला होतात तेव्हा मला खूप आनंद झाला होता.
मला आठवतंय तुमची यात्रा टिळक रोडवरून चालली होती. मी तुमची वाट पाहत उभा होतो. तुमची गाडी अचानक आली आणि मी तुम्हाला प्रत्यक्ष डोळेभरून पाहिले. तुमच्या वजनदार व्यक्तिमत्वाने मी अजूनच प्रभावित झालो. अभ्यास करून करून वाढलेली तुमची ढेरी मी प्रत्यक्ष पाहिली. तुम्ही मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ खडसे,विनोद तावडे,बावनकुळे या तुम्हाला आव्हान देणाऱ्या नेत्यांची तिकिटे कापली त्याचा मला खूप आनंद झाला. तुमच्या राजकारणाला तोड नाही. जनतेच्या मनातील मुख्यमंत्री पंकजा ताई पडल्यावर तुम्हाला जेवढा आनंद झाला त्यापेक्षा मला जास्त आनंद झाला होता. पण तुमची प्रगती राजीनामे खिश्यात घेऊन पोकळ धमक्या देणाऱ्या जळक्या सेनेला पाहवली नाही. त्या संजय राऊतांनी सगळा घोळ घातला. त्या भाऊने सुरवातीपासून पत्रकार परिषदा घेऊन तुमच्यावर निशाणा साधला. सेनेला युती करायची नव्हती. त्यो संजय राऊत जेव्हा पत्रकार परिषद घेऊन भाजपवर टीका करायचा तेव्हा खूप राग यायचा त्याचा.
त्याच्यामुळेच तुम्ही पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकला नाहीत. तुम्ही पुन्हा मुख्यमंत्री होणार नाही असं चित्र स्पष्ट झाल्यापासून मला जेवण गेलं नाही. तुमचा आणि मोदींचा एकत्रित फोटो माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर अजूनही आहे. तुम्ही वास्तवाने मुख्यमंत्री पदी नसलात तरी माझ्या मनात फक्त आणि फक्त तुम्हीच मुख्यमंत्री आहात. मुख्यमंत्री पद गेले असले तरी वहिणींच्या अलौकिक प्रतिभेवर त्याचा परिणाम होऊ देऊ नका. त्यांचा सुरेल आवाज ऐकण्यास हा महाराष्ट्र उत्सुक आहे. तुमच्या अहंकारामुळे सत्ता गेली असा निष्कर्ष संघाच्या निष्कर्ष समितीने काढला आहे. ज्या संस्थेने तुम्हाला मोठं केलं तिनेच तुमच्यावर असे गंभीर आरोप केले. खूप वाईट वाटतं ओ. तुमच्यावर कठीण काळ आला की तुमच्या जवळचे लोकं देखील तुमच्यावर वाटेल ते आरोप करतात.
पण मी सदैव तुमच्या सोबत आहे. अडीच वर्षाचं मुख्यमंत्री पद लाथाडून तुम्ही मुख्यमंत्रीपदाचा त्याग केलात. तुमच्या त्यागाला सलाम. तुमच्या अहंकारामुळे हे पद गेले नसून सेनेच्या जळक्या वृत्तीमुळे तुमचे हे पद गेले आहे. जाऊ द्या पद गेलं ते एक चांगल झालं. आता तुम्हाला अभ्यासाची गरज नाही. काही जळके लोक तुम्हाला टरबुज्या म्हणून चिडवतात. त्यांना धडा शिकविण्यासाठी तुम्ही व्यायामाला सुरवात करा. व्यायामामुळे कमी झालेली तुमची ढेरी पाहून वहिनी देखील तुमच्यावर खुश होतील. झालं गेलं विसरून जा. पुन्हा एकदा नव्या जोमाने कामाला लागा. पूढच्या निवडणुकीत पुन्हा येण्यास सज्ज व्हा. हा महाराष्ट्र तुम्हाला, वहिनींना खूप मिस करतोय, मिस करत राहील. वहिणींमधल्या गायिकेचा प्रोत्साहन द्या. तुमचाच हाडाचा चाहता.