कराड | कराड येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधीशसो, श्री. व्ही. व्ही. कठारे यांच्या सेशन कोर्टात काॅलेजला मामेबहिणीस सोडायला आलेल्या आत्तेभावास वाटेतच आडवा जावून चालू गाडीवरच दांडक्याने त्याचे खांद्यावर जोराने मारून त्यास खाली पाडले. पुन्हा दांडक्याने मारून तो खाली पडलेला असताना तेथील एक मोठा दगड दोन हाताने उचलून दोन ते तीन वेळा त्याच्या डोक्यात मारून त्याचा खून केला. या घटनेतील आरोपी राहुल उर्फ लक्ष्मण रामचंद्र जाधव (रा. चव्हाणवाडी- धामणी, ता. पाटण जि. सातारा) या आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
याबाबत माहिती अशी की, यामधील आरोपी राहुल उर्फ लक्ष्मण जाधव हा त्याचे गावातील साक्षीदार मुली बरोबर प्रेमसंबंध प्रस्तापित करण्यासाठी तिला गाडी आडवी मारणे, वाटेत आडवणे, पाठलाग करणे, फोन करणे या प्रकारे त्रास देत होता. यावरून मुलीच्या घरातील नातेवाईकांनी राहूल यास ताकिद दिली होती. तसेच ढेबेवाडी पोलीस स्टेशनला त्याचे विरुध्द तक्रारही दिली होती. त्यानंतर दि. 06/11/2015 रोजी सदर साक्षीदार मुलीस व तिच्या मैत्रीणीस ज्युनिअर कॉलेज आचरेवाडी येथे जाण्यासाठी सकाळी 6.30 चे सुमारास तिचा अत्तेभाऊ अजित आनंदा देसाई याने त्याचे मोटर सायकलवरून चव्हाणवाडी येथून चव्हाणवाडी फाट्यावर सोडणेस गेला. त्या दोघींना सदर चव्हाणवाडी फाट्यावर सोडून परत चव्हाणवाडीकडे जात होता. तेव्हा आरोपी हा वाटेत झुडूपामागे दबा धरून बसला होता. सदर अजित देसाई यास मोटार सायकलवरून येताना पाहून आरोपीने त्याला वाटेतच आडवा जावून चालू गाडीवरच दांडक्याने त्याचे खांदयावर जोराने मारून त्यास खाली पाडले. व त्यास पुन्हा दांडक्याने मारून तो खाली पडलेला असताना तेथील एक मोठा दगड दोन हाताने उचलून दोन तीन वेळा त्याच्या डोक्यात मारून त्याचा खून केला. संशयित आरोपी विरुध्द् ढेबेवाडी पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला होता.
या कामी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिशसो व्ही. व्ही. कठारे यांचे समोर आरोपी विरुद् सदरच्या सेशन खटल्याची सुनावणी करण्यात आली. त्याकामी सरकार पक्षातर्फे महत्वाचे 16 साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये परिस्थीतीजन्य पुराव्याचे अनुषंगाने काही साक्षीदारांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. आरोपीस दोषी धरून कलम ३०२ करीता जन्मठेप व 5000/- दंड व दंड न भरल्यास 6 महिने साधी कैद, तसेच कलम 341 करीता 1 महिना साधी कैद व 500/- दंड व दंड न भरल्यास 7 दिवसांची साधी कैद अशी शिक्षा व दंड सुनावली आहे. सदर कामी सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील मिलिंद व्ही. कुलकर्णी यांनी कामकाज पाहिले. याकामी ढेबेवाडी पोलिस स्टेशनचे तपासी अंमलदार पीएसआय एन. आर. चौखंडे यांनी सखोल तपास केला. केस कामी कोर्ट ड्युटीचे पोलिस हवालदार योगिता पवार व इतर पोलिस स्टाफ यांनी सहकार्य केले.