महाबळेश्वर | घरगुती कारणातून चिडून जावून पत्नीला पेटवून देवून तिचा खून केल्याप्रकरणी पती राजेश उर्फ राजू गणपत शिंदे (वय- 30 रा. खांबील पोकळे ता . महाबळेश्वर) याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश मंगला धोटे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. न्यायाधिशांनी सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरुन आरोपीला जन्मठेप व 5 हजार रुपये दंड तो न भरल्यास 6 महिने साध्या कैदेची शिक्षा ठोठावली.
याबाबत अधिक माहिती अशी, ही घटना 2017 मध्ये घडली आहे. खून झालेल्या विवाहितेचे नाव सुनिता राजू शिंदे (वय-28) असे आहे. राजू शिंदे व सुनिता शिंदे यांचा विवाह झाल्यानंतर राजू पत्नीला वारंवार मानसिक त्रास देत होता. यातूनच शिवीगाळ, दमदाटी करुन मारहाण देखील करत होता. घरगुती कारणातून चिडून जावून राजू शिंदे याने दि. 9 जानेवारी 2017 रोजी पत्नीला दिवसा दुपारी 4 वाजता तिच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. या घटनेने परिसर हादरुन गेला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या विवाहितेला उपचारासाठी सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर विवाहितेवर उपचार सुरु केल्यानंतर ती 90 टक्के भाजल्याचे समोर आले. या दरम्यान तिचा जबाबही घेण्यात आला. उपचार सुरु असताना दि. 11 जानेवारी रोजी विवाहितेचा मृत्यू झाला.
मेढा पोलिस ठाण्यात पतीवर खूनाचा दाखल झाल्यानंतर सपोनि देवीदास कठाळे यांनी तपास करुन सातारा जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षाच्यावतीने अॅड. आशीर्वाद कुलकर्णी यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. मृत्यूपूर्व जबाब, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तसेच शास्त्रोक्त व भौतिक पुरावा या खटल्यात महत्वूपर्ण ठरला. न्यायाधिशांनी सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरुन आरोपीला जन्मठेप व 5 हजार रुपये दंड तो न भरल्यास 6 महिने साध्या कैदेची शिक्षा ठोठावली.