सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
कोरेगाव तालुक्यातील चिलेवाडी- भाडळे येथील चौकात एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर दारूच्या अड्डा सायंकाळी चिलेवाडी येथील रणरागिनींनी उद्ध्वस्त केला. यावेळी दारू अड्डा चालविण्याऱ्यास चांगला चोपही दिला. तसेच शेडमधील सर्व साहित्य व बाटल्या फोडून टाकल्या.
चिलेवाडी- भाडळे चौक मध्यवर्ती आहे. वर्दळीच्या या चौकापासून भाडळे, चिलेवाडी, नागेवाडी, हासेवाडी, बोधेवाडी (भाडळे), धनगरवाडी आदी गावे वाड्या हाकेच्या अंतरावर आहेत. त्यामुळे या चौकात परिसरात ग्रामस्थ, वाहनांची कायम वर्दळ असते. या चौकात सुमारे वर्षापूर्वी एक व्यक्तीने पत्र्याचे शेड टाकून खाद्य पदार्थ विक्रीचे दुकान सुरू केले होते. त्यानंतर गेल्या काही दिवसापासून मालकाने या शेडमध्ये बेकायदेशीररीत्या देशी- विदेशी दारूविक्री सुरू केली होती. त्यामुळे परिसरातील गावे- वाड्यांतील ग्रामस्थांसह युवक वर्गाची दारू पिण्यासाठी गर्दी वाढू लागली होती. घरातून बाहेर पडलेले लोक सकाळपासून या चौक परिसरात दारू पिऊन काही वेळी रस्त्यात पडत असत. त्यामुळे महिला त्रस्त झाल्या होत्या.
चौकातील हा अड्डा बंद झाल्याशिवाय लोकांचे दारू पिण्याचे प्रमाण कमी होणार नाही किंवा बंद होणार नाही, अशी चर्चा महिला वर्गात सुरू झाली होती. आपण हा दारू अड्डा उद्ध्वस्त करूया, अशी चर्चा महिलांमध्ये सुरू होती. या पार्श्वभूमीवर सायंकाळी सहाच्या सुमारास चिलेवाडी येथील काही महिलांनी थेट चौकात जाऊन संबंधित दारूअड्डयावर छापा टाकून तेथील दारूच्या बाटल्या फोडल्या. इतर साहित्य फोडले. मालकाला पकडून त्याला दारू धंदा बंद करण्याची मागणी केली. त्याला भविष्यात पुन्हा दारू अड्डा सुरू केल्यास पुन्हा अड्डा उद्ध्वस्त करण्याचा इशारा देऊन पोलिस अधीक्षकांकडे तक्रार करण्याचा इशारा दिला. अखेर दारू अड्डा चालकाने पुन्हा दारू अड्डा सुरू न करण्याची ग्वाही रणरागिनींना दिली.