बंदी आदेश असतानाही शहरात दारू विक्री सुरूच

दुकानांच्या बाजूला उभे राहून होत आहे विक्री

औरंगाबाद : शहरात कोरोना रुग्ण संख्या झपाटयाने वाढत असताना आणि शहर व जिल्ह्यात कडक निर्बंध लागू असताना खडकेश्वर येथील हाॅटेल ब्लू हेवन बारवर दुकानाच्या बाजूला उभे राहून दारूची विक्री करताना पोलिसांनी एकास रंगेहात पकडल्याची घटना आज घडली आहे.  ही कारवाई क्रांतीचौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डाॅ. गणपत दराडे यांच्या पथकाने केली.

या ठिकाणी वाईन व दारूची विक्री सुरु असल्याचे कळताच या ठिकाणी बनावट ग्राहक पाठवून कारवाई करण्यात आली.  होम डिलिव्हरीचे आदेश असतानाही रोडवरच व दुकानाच्या बाजूला उभे राहून वाईनची विक्री सुरु असल्याचा सुगावा पोलिसांना लागला. त्यानंतर एकाला ताब्यात घेऊन क्रांती चौक पोलीस स्टेशनला नेण्यात आले. मात्र पोलिसांची गाडी गेली की पुन्हा वाईन विक्री सुरू होते, असे काही जणांचे म्हणणे आहे. अनेक जण या गोरख धंद्यात सहभागी असण्याची शक्यता नाकारता नाही. पोलीस आयुक्त कार्यालय हाकेच्या अंतरावर असूनही संबंधित अधिकारी याकडे डोळेझाक का करतात, असा प्रश्न यावेळी काही जणांनी व्यक्त केला.

दरम्यान, लॉकडाऊन काळात शहरात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त असतानाही काही ठिकाणी दारू विक्री अजूनही सुरु असल्याचे या प्रकारावरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणेसमोर आव्हान उभे ठाकले आहे. या घटनेनंतर तळीरामांप्रमाणेच अवैध दारू विक्री करणाऱ्या दुकान व बार चालकांचे धाबे दणाणले आहे.

You might also like