कराड | धान्याच्या पावडरीच्या उग्र वासाने चिमुकल्या दोन सख्या बहिण-भावाचा मृत्यू झाला. मुंढे (ता. कराड) येथे ही हृदयद्रावक घटना घडली. त्याबाबत त्या चिमुकल्यांच्या नातेवाइकांनीच तशी माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. श्लोक अरविंद माळी (वय- 3) व तनिष्का अरविंद माळी (वय- 7) अशी मृत्यू झालेल्या चिमुकल्यांची नावे आहेत. सख्या बहिण भावाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी : धान्याची साठवणूक करताना त्यात टाकल्या जाणाऱ्या पावडरीच्या उग्र वासाने चिमुकल्या दोघांनाही त्रास झाल्याचे नातेवाईकांनी सांगितले आहे. मुंढे येथील अरविंद माळी यांच्या घरात धान्य साठवून ठेवत असताना त्यामध्ये पावडरीचा वापर केला होता. त्या पावडरचा उग्र वास घरात येत असल्याचे नातेवाइकांनी पोलिसांना सांगितले आहे. उग्र वासामुळे श्लोक व तनिष्का यांना उलट्यांचा त्रास झाला. त्यामुळे काल (सोमवारी) प्रथम श्लोकला उलट्या व खोकल्याचा त्रास झाल्याने नातेवाइकांनी त्याला कराड येथील खासगी रुग्णालयात उपचारास दाखल केले. उपचार सुरू असतानाच सोमवारीच श्लोकचा मृत्यू झाला.
मंगळवारी त्याची मोठी सात वर्षांची बहीण तनिष्कालाही उलट्या व खोकल्याचा त्रास होऊ लागला. त्यामुळे तिलाही नातेवाइकाने रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना तिचाही सायंकाळी मृत्यू झाला. तीन वर्षाच्या श्लोकच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर अतिरक्तस्त्रावामुळे व शरीरातील पाणी कमी झाल्याने मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालात म्हटले असल्याचे पोलिसांनी सांगितले. तनिष्काचे सायंकाळी शवविच्छेदन केले आहे. त्याचा अहवाल पोलिसांना अद्याप मिळाला नाही. तिच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही. या घटनेने मुंढेसह परिसरात हळूहळू व्यक्त केली जात आहे. फौजदार प्रवीण जाधव तपास करत आहेत.