हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Loan Foreclosure) आपली स्वप्ने पूर्ण करताना आर्थिक अडीअडचणीत बँकेच्या माध्यमातून मिळणारे लोन कामी येते. त्यामुळे घर घ्यायचे असो वा गाडी, शिक्षण घ्यायचे असो वा व्यवसाय वाढवायचा असो लोनच्या माध्यमातून अर्थसहाय्य घेतले जाते. ग्राहकांची गरज पाहता बँकेच्या माध्यमातूनदेखील वेगवेगळ्या प्रकारचे लोन दिले जाते. गेल्या काही काळात लोन मिळण्याची प्रक्रिया सोपी करण्यात आली आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला आपल्या वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी तातडीने जरी लोन घ्यायचे असेल तरीही आता ते शक्य आहे.
आपल्या वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी घेतलेले लोन ही एकप्रकारे जबाबदारी असते. कारण आपण घेतलेल्या कर्जाची परतफेड ही आपल्याला निश्चित केलेल्या हप्त्यांमध्ये करायची असते. यातील काही लोन हे अल्प कालावधीचे असू शकते. तर घर आणि गाडीवरील लोन हे दीर्घ कालावधीतील असतात. (Loan Foreclosure) सर्वसाधारणपणे गृहकर्जाच्या कालावधी किमान १५ ते २० वर्षांचा असतो. त्यामुळे कर्जदाराला प्रत्येक महिन्यात निश्चित हप्त्याच्या स्वरूपात परतफेड करणे बंधनकारक असते. पण अनेक कर्जदार मुदतपूर्तीआधीच लोन क्लिअर करून मोकळे होतात. ज्यावेळी बँका लोन फोरक्लोजर शुल्क आकारतात. अनेक लोकांना ‘लोन फोरक्लोजर’बद्दल माहित नसते. म्हणून आज आपण याविषयी सविस्तर माहिती घेत आहोत.
‘लोन फोरक्लोजर’ म्हणजे काय? (Loan Foreclosure)
अनेकदा मोठ्या लोनचे हफ्ते फेडताना मोठी आर्थिक ओढाताण होते. त्यामुळे अशा दीर्घकालीन लोनबाबत अनेक कर्जदार परतफेडीच्या कालावधीपूर्वी कर्जाची परतफेड करतात आणि मुदत पूर्ण होण्याआधीच कर्ज खाते बंद करतात. यावर आकारल्या जाणाऱ्या शुल्कास ‘लोन फोरक्लोजर’ असे म्हटले जाते. तुम्हीही तुमच्या चालू लोनबाबत असा निर्णय घेऊ शकता. मात्र यासाठी बँकांचे काही नियम असतात. त्यांचे पालन करणे बंधनकारक असते. चला तर ‘लोन फोरक्लोजर’साठी बँकांचे कोणते नियम असतात? ते जाणून घेऊया
लोन फोरक्लोजर शुल्क कधी भरावे लागते?
खरंतर पर्सनल लोन, एज्युकेशन लोन, बिझनेस लोन, बाईक लोन आणि कार लोन सारख्या प्रकारांमध्येदेखील लोन फोरक्लोजरचा (Loan Foreclosure) पर्याय असतो. मात्र, यात प्रत्येक कर्जदाराला फोरक्लोजर शुल्क भरावे लागत नाहीत. या संबंधित RBI चा एक नियम आहे.
तो असा की, जर तुम्ही लोन घेतेवेळी फ्लोटिंग व्याजदरावर घेतले असेल तर RBI कडून व्याजदरात जसा बदल होईल तसा बदल तुमच्या लोनवरील व्याजदरात होतो. त्यामुळे फ्लोटिंग व्याज दरावर कर्ज घेतल्याने तुम्हाला मुदतपूर्व परतफेड करायची असल्यास कोणत्याही प्रकारचा फोर क्लोजर शुल्क द्यावा लागत नाही. (Loan Foreclosure) याउलट मुदतीआधी अर्थात फिक्स व्याजदरावर कर्ज घेतले असेल तर तुम्हाला मुदतीपुर्वी अकाउंट क्लोज करायचे असल्यास फोरक्लोजर शुल्क द्यावा लागतो.
बँकांमध्ये मुदतीआधी कर्जाची परफेड करूनही शुल्क का आकारले जाते?
आता याबाबत बोलायचं झालं तर मुख्य म्हणजे प्रत्येक बँकेचे फोर क्लोजर चार्जेस वेगवेगळे असू शकतात. त्यामुळे कर्जदाराने मुदतीआधी घेतलेल्या कर्जाची पूर्ण परतफेड केली तर त्याच्यावर असलेली कर्जाची जबाबदारी हटते. पण, यामुळे बँकांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे एखादा कर्जदार मुदतीआधी कर्जाची परतफेड करत असेल तर बँका फोरक्लोजर शुल्क (Loan Foreclosure) आकारतात. यात तुमची जी थकीत रक्कम असते त्याच्या ५% शुल्क आकारले जाऊ शकते. याबाबत सर्व माहिती कर्ज देतेवेळी बँकांकडून दिलेल्या कागदपत्रांमध्ये दिलेली असते. त्यामुळे कर्ज घेताना फोर क्लोजरच्या अटींची माहिती करून घ्यावी.