हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशवासीयांच्या अडचणी लक्षात घेऊनच देशातील संचारबंदी ३ मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय नरेंद्र मोदींनी आज जाहीर केला. १४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता देशाला संबोधित करताना मोदींनी हा निर्णय घेत असल्याचं सांगितलं. कोरोनाशी संबंधित हॉटस्पॉटवर लक्ष देण्यात येत असून ज्या ठिकाणी २० एप्रिलपर्यंत कोरोनाबाधित रुग्ण आढळणार नाहीत तिथे अत्यावश्यक सुविधा चालू करण्यात येतील असं पंतप्रधान पुढे म्हणाले. सरकारतर्फे एक विस्तृत मार्गदर्शिका जारी करण्यात येणार आहे. रोजंदारीवर पोट भरणारे लोक माझ्या कुटुंबाचा सगळ्यात महत्वाचा भाग असून नव्या मार्गदर्शिकेत त्यांना प्राधान्य देण्याबाबत सूचना केल्या असल्याचं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.
देशवासीयांना या काळात आलेल्या समस्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या आहेत. पण यातूनही तुम्ही मार्ग काढून देशासाठी शिस्तबद्ध सैनिकप्रमाणे आपलं कर्तव्य बजावत आहात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं कौतुक आहे. आम्ही भारताचे लोक म्हणजे वेगळं काही नसून लोकांचा एकत्रित लढाच आहे. बाबासाहेबांचं जीवनच आपल्याला अडचणींविरुद्ध चार हात करायला शिकवत आहे. मी समस्त देशवासीयांयर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतो असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना संबोधित करताना सांगितलं. भारतात आतापर्यंत १ लाखहून अधिक बेडची व्यवस्था करण्यात आली असून देशभरात ६०० रुग्णालय केवळ कोरोनाच्या इलाजासाठी तयार ठेवण्यात आल्याचं मोदी यावेळी म्हणाले.
देशभरातील तरुण वैज्ञानिकांनी कोरोनावरील लस शोधण्यासाठी पुढं यावं असं म्हणत मोदींनी ७ गोष्टींमध्ये देशवासीयांची मदत मागितली.
१. ज्येष्ठांची काळजी घ्या.
२. लॉकडाउनचं पालन करा, मास्क वापरा.
३. योग्य आहार घ्या आणि आयुष मंत्रालयाचा संदेश विचारात घ्या.
४. आरोग्य सेतू app डाऊनलोड करा. माहिती इतरांना द्या.
५. गरिबांची काळजी घ्या.
६. कुणालाही नोकरीवरून काढू नका, त्यांची काळजी घ्या.
७. आरोग्यसेवक, पोलीस यांची काळजी घ्या.
ही सप्तपदीच भारताला विजयाकडे नेईल असा विश्वास मोदींनी यावेळी व्यक्त केला.