आईच्या औषधांसाठी तिने केला ८० किलोमीटरचा प्रवास..!! लॉकडाऊन कालावधीतील कविताच्या जिद्दीची प्रेरक कहाणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

संघर्षाला बळ स्वप्नांचं | योगेश नंदा सोमनाथ

कविता प्रभावती. नाव तसं ऐकलेलं, ती स्वतः तयार करत असलेल्या कविताही व्हाट्सअप्प ग्रुपवर ओझरत्या वाचल्या होत्याच. पण लाडक्या अल्फाज ग्रुपवरील संजय सोनटक्के सरांच्या ‘त्या’ मेसेजमुळं कविताची दखल घेणं भागच पडलं. सोलापूरमधील सांगोला या तालुक्यात राहणारी कविता, कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने पीडित असलेल्या आपल्या आईच्या औषधांसाठी ज्यावेळी ८० किलोमीटर पायी प्रवास करते, तेव्हा तिची दखल घेणं हे आपलंच शहाणपण असतं.

whatsapp ग्रुपवरील संजय सोनटक्के यांचा संदेश.

लॉकडाऊनला महिना पूर्ण होत असताना सामान्य नागरिकांच्या अनेक समस्या आता डोकं वर काढू लागल्या आहेत. या लॉकडाऊनमधीलच ही एक प्रेरणादायी कहाणी. कविता प्रभावती, राहणार सांगोला. वकिलीचं शिक्षण पूर्ण करुन नुकतीच प्रॅक्टिसला सुरुवात केलेली. वडिलांचा विरह लहानपणापासूनच. आई, आज्जी आणि आजोबांच्या सोबतीने आयुष्याचा प्रवास पुढे करत निघालेली कविता. ४ महिन्यांपूर्वी आजारपणाने आजोबांनाही हिरावून नेलं आणि घरी उरल्या फक्त तीन पिढीतील ३ महिला. हे लिहायला २ मिनिटं लागली असली तरी ते पहिल्यांदा ऐकून दोन मिनिटं मीही सुन्न झालो होतो. जुना संघर्ष कोळून पीत वकील झालेल्या कविताने कष्ट करुन काळवंडलेल्या आपल्या आईच्या हातांना आराम द्यायची स्वप्न काही दिवसांपूर्वी पाहिली होती. आणि आयुष्यात पाठी असलेल्या अनुभवानुसार याही वेळी नवीन समस्या उभी राहिलीच. कोरोना नावाच्या महामारीची समस्या. समस्या जी फक्त रुग्णांना छळत नाही तर इतरांनाही गुडघे टेकायला भाग पाडणारी अशीच..!!

कविताची समस्या तशी पंधरा दिवसांपूर्वीची. ३ वर्षांपासून कॅन्सरवर उपचार घेत असलेल्या प्रभावती काकूंच्या औषधांचा डोस संपत आला होता. लॉकडाऊन असल्याने मुलगी कविता हिने जवळील मेडिकलमध्ये अगोदरच औषधांची चिठ्ठी देऊन ठेवलेली. २ दिवस झाले, ४ दिवस उलटून गेले, बघता बघता १० दिवसही उलटून गेले पण मेडिकलवाल्याकडून व्यवस्थित काहीच प्रतिसाद नाही. मेडिकलवाल्याला जाब विचारला असता तुम्ही स्वतःच ही औषधं मिरजेवरुन घेऊन या असं सांगणं कानावर पडलं. महात्मा गांधी कॅन्सर हॉस्पिटलमध्ये संपर्क साधला असता, प्रोफेशनल कुरियर बंद असल्याने तिथूनही मदत मिळाली नाही. याही परिस्थितीत संयम न सोडता कविताने मिरजला कसं जाता येईल याची गणितं आखायला सुरुवात केली. आधी मावसभावाला सांगितलं की पोलिसांची परवानगी मिळतेय का बघ. सांगोला पोलीस म्हणाले, “जास्त सिरीयस केस असेल तर जाऊ शकता, पण चिठ्ठी आणि जिल्हाधिकारी ऑफिसची परवानगी सोबत ठेवा.” जिल्हाधिकारी ऑफिसच्या हेल्पलाईनला फोन केला, ऑनलाईन फॉर्म भरला तरी त्यांच्याकडूनही “तुम्ही आहे तिथेच मेडिकल मध्ये चौकशी करा” अशा सूचना सांगण्यात आल्या. पास मिळाला नाहीच. तरीही हाच मावसभाऊ पुढे जाण्यासाठी पेट्रोल टाकायला गेल्यावर तिथे पोलीसांनी अडवलं व डॉक्टरांची डिटेल्स व ट्रीटमेंटची फाईल बघूनही ते म्हणाले, “इथल्याच मेडिकलमध्ये बघा, मिरजेत कडक बंदोबस्त आहे, जाता येणार नाही. जायचा प्रयत्न केलाच तर लॉकडाऊन संपेपर्यंत गाडी जप्त होईल.” लहान भावाने हीच भीती मनात धरली आणि मिरजेला जायचा विचार सोडून दिला.

प्रायव्हेट वाहनाची चौकशी केली असता भाडे जास्त सांगण्यात आलं. सर्व पैसे गाडी भाड्याला गेले तर औषधं कशी आणायची हा विचार करून प्रायव्हेट वाहनाचा विचार कविताने सोडून दिला. लॉकडाऊन असल्याने लोकं निघेल तिथे पैसे काढत आहेत हे प्रकर्षानं जाणवलं. गावातील दूध आणि भाजीपाल्याच्या गाड्या मिरजकडे जात असल्या तरी आजारी पेशंट आणि त्यासोबत मुलीला घेऊन जाताना, त्यांना किंवा स्वतःला कोरोनाची लागण झाली तर काय करायचं? या भीतीने त्यांना नकार देऊ लागले. तब्बल १२ दिवसांच्या खेळ-खंडोब्यानंतर कविताने मनाशी ठरवलं – आईच्या जीवाशी खेळ नकोच, आता चालत म्हटलं तरी जाऊ, पण औषधं घेऊनच येऊ. आणि सुरु झाला प्रवास धाडसाचा. रोड सरळ असला तरी आईनेसुद्धा हट्ट केला होता, की मी सोबत येते म्हणून..!! तिच्या त्या अवस्थेतही ती लेकीसोबत निघाली. स्वतःच्या औषधरुपी व्हेंटिलेटरचा आसरा घ्यायला.

रस्त्याने जाताना एखाद्या गावात प्रवेश केला असता हे लोक कुठून पळून आलेली असतील? यांच्यामुळे आपल्यालाही कोरोना होईल या भीतीने लोकं विचित्र काहीतरी घडत असल्यागत बघत होते. इतक्यात मित्रमंडळींपैकी विनोद के यांनी कविताची कॉल करून चौकशी केली. कविता मिरजला जात असल्याचं विनोदला समजलं तेव्हा त्यांनी हयात फाउंडेशनच्या मुसा तमडोळे, सईद हेरलेकर आणि हिलाल कच्छी या मित्रांद्वारे औषधं निम्म्या रस्त्यापर्यंत पोहचवण्याची सोय केली. तीही ऐनवेळची ऍडजस्टमेंटच. तब्लिगी प्रकरणानंतर देशभरातील मुस्लिमांकडे संशयाची सुई रोखून बघणाऱ्यांसाठी हा प्रसंग सांगणं जास्त गरजेचं ठरतं ते केवळ माणुसकीचं नातं म्हणूनच..!!

कविता आणि आई चालतच होत्या. जमेल तेवढा रस्ता कापायचा एवढंच त्यांच्या डोक्यात. मजल दरमजल करत तब्बल ४० किलोमीटरचा रस्ता त्यांनी रखरखीत उन्हातून पार केला आणि १२ दिवसांनंतर औषधांच्या पाकिटाचा प्रवास पूर्ण झाला. ३ महिन्यांच्या एकत्रित गोळ्या घेऊन कविता आणि आईने परतीचा प्रवास सुरु केला. सकाळी ५.३० वाजता सूरु झालेला हा प्रवास संध्याकाळी ७.३० च्या सुमारास पूर्ण झाला. हा सर्व प्रवास करताना कविताच्या डोक्यात २०१८ च्या आठवणी तरळत होत्या. ज्यावेळी आपल्या पदवीच्या शेवटच्या वर्षात असताना आपली एकमेव आधार असणारी आई मृत्यूच्या दाढेत उभी आहे, याचा तीव्र झटका तिला बसला होता. “मला आयुष्यात कोणतीच गोष्ट सहजपणे कधीच मिळाली नाही, संघर्ष करतच सर्व प्रवास करावा लागल्याचं कविता सांगते. २०१८ साली अनुभवलेल्या गोष्टी पुन्हा घडून, आईला जास्त त्रास झाला असता तर मी स्वतःलाच माफ करु शकले नसते असं म्हणत स्वतःच्या हिंमतीवर कविताने ही लढाई यशस्वी केली.

२०२० सालीसुद्धा गाव-खेड्यांमध्ये आणि काही दुर्गम भागांमध्ये अशा प्रकारच्या अडचणी उदभवत असतातच. स्वतःसोबत स्वतःवर अवलंबून असलेल्या कुटुंबीयांचा जीव वाचावा म्हणून दीड ते दोन हजार किलोमीटरची पायपीट केलेले परप्रांतीय लोकही या काळात पाहायला मिळाले आहेतच. देशातील अर्धी जनता घरातच बसून आपल्या आवडीचे चमचमीत पदार्थ रोज खाऊन त्याचे फोटो सोशल मीडियावर टाकण्यासाठी उतावीळ झालेली असताना जगण्याच्या अस्तित्वाविषयी प्रश्न निर्माण झालेल्या लोकांचा लढा सरकार आणि प्रशासनाच्या योजनांची हतबलताच दाखवून देत आहे. यातून मार्ग निघण्यासाठी सामान्य जनतेशी कनेक्ट वाढवणं हे काम आता लोकप्रतिनिधींना करावंच लागेल. तसं केलं नाही, तर जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीत लोकांचा उपयोग फक्त मतं मागण्यासाठीच होतो असं म्हणावं लागेल.

कविता प्रभावती या वकील आहेत. त्यांना कविता, शायरी करण्याची विशेष आवड आहे. त्यांचा संपर्क क्रमांक – 7020621120.

Leave a Comment