पुणे । करोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता पुण्यात जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यात १० दिवसांचा लॉकडाउन जाहीर केला असून मंगळवारी १४ जुलैच्या मध्यरात्री सुरु झालेला लॉकडाउन २३ जुलैपर्यंत कायम असणार आहे.लॉकडाउनच्या नियमांच पालन व्हावं यासाठी मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. लॉकडाउन कडक पाळला जावा यासाठी रस्त्यावर जवळपास ७ हजार पोलिस तैनात करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा, कामगार वगळता इतरांना घराबाहेर पडण्यास मनाई आहे. याशिवाय लॉकडाऊन कालावधीत काय सुरु आणि बंद राहणार याचा तपशील खालीलप्रमाणे
काय राहणार सुरु?
१)दूध विक्री आणि दुधाचे घरपोच वितरण सुरु राहील.
२)खासगी आणि सार्वजनिक वैद्यकीय सेवा, रुग्णालये, रुग्णालयाशी निगडीत सेवा सुरु राहतील.
३)पेट्रोल पंप संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत.
४)१९ ते २३ जुलैपर्यंत सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेची दुकानं सुरु राहणार आहेत.
काय राहणार बंद?
१)१३ ते २३ जुलैदरम्यान सर्व उद्यानं आणि क्रीडांगणं बंद राहणार आहेत. याशिवाय सरकारच्या वंदे भारत योजनेअंतर्गत येणारे उपहारगृह, बार, लाँज आणि हॉटेल वगळता सर्व रिसॉर्ट, मॉल, बाजार, मार्केट पूर्णपणे बंद राहणार आहेत. याशिवाय सर्व खासगी कार्यालयं बंद राहतील
२)पुण्यात पुढील १० दिवस सर्व सलून दुकानं, स्पा, ब्युटी पार्लर पूर्णपणे बंद असणार आहेत.
३)शहरातील सार्वजनिक व खासगी बस सेवा, ट्रक, टेम्पो, ट्रेलर, ट्रॅक्टर, इत्यादीसाठी संपूर्णत बंद राहील.
४)१४ ते १८ जुलै या पाच दिवसात भाजी मार्केट, फळ मार्केट, आठवडी बाजार, फेरीवाले पूर्णपणे बंद असतील. १९ ते २३ जुलैदरम्यान सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत भाजी मार्केट सुरु राहील.
५)१४ ते १८ जुलै या पाच दिवसात मटण, चिकन, अंडी यांची विक्री पूर्णपणे बंद असणार आहे. १९ ते २३ जुलैदरम्यान सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत मटण, चिकन, अंडी यांची विक्री सुरु राहील.
६)सर्व प्रकराचे बांधकाम, बांधकामाची कामं बंद राहतील. ज्या बांधकामाच्या जागेवर कामगारांची निवास व्यवस्था असेल त्यांना काम सुरु ठेवता येईल.
७)लॉकडाउनचे पूर्ण दहा दिवस शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, सर्व प्रकारचे शिकवणी वर्ग पूर्णपणे बंद राहतील.
८)झोमॅटो, स्विगीसारख्या ऑनलाइन पोर्टलवरुन मागवले जाणारे खाद्यपदार्थ पुरवठा सेवा दहा दिवस बंद असणार आहे.
९)सार्वजनिक व खासगी प्रवासी वाहने- दोन चाकी, तीन चाकी व चार चाकी संपूर्पत: बंद राहतील. अत्यावश्यक सेवेतील वाहने, पूर्व परवानगी प्राप्त वाहने तसंच विमानतळ, रेल्वे स्टेशन येथे जाणे-येणे करिता व वैद्यकीय कारणास्तव प्रवासासाठी खासगी वाहनांचा वापर अनिवार्य राहील.
१०)सर्व चित्रपटगृह, व्यायामशाळा, जलतरण तलाव, करमणूक उद्योग, नाट्यगृह, बार, प्रेक्षागृह बंद राहतील.
११)सर्व प्रकारचे मंगल कार्यालय, हॉल तसंच लग्न समारंभ, स्वागत समारंभ बंद राहतील. मात्र यापूर्वी परवानगी घेतलेले लग्न समारंभ २० पेक्षा कमी व्यक्तींच्या उपस्थितीत आयोजित करता येतील.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”