हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे सरकार ने १ जून पर्यंत लॉकडाऊन लागू केला आहे. त्या अंतर्गत अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली आहे. मात्र यापुढे हे लॉकडाऊन वाढणार का? याबाबत सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार लॉकडाऊन बाबत आज राज्य मंत्रिमंडळाची दुपारी साडेतीन वाजता बैठक होणार आहे. या बैठकीत लॉकडाऊन वाढणार की निर्बंध शिथिल होणार यावर चर्चा होणार आहे.
मात्र राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी होत असतानाही महाराष्ट्र सरकार राज्यव्यापी लॉकडाऊन आणखी एक आठवड्यापर्यंत वाढवण्याच्या विचारात असल्याची माहिती समोर येत आहे. पहिल्या टप्प्यात अत्यावश्यक दुकान वगळता इतर दुकाने सुरू होऊ शकतात. महत्वाचे म्हणजे टप्प्याटप्प्याने अनलॉकची प्रक्रिया १ जून पासून करायची की ७ जून पासून याबाबतचा अंतिम निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाईल. तर दैनंदिन गरजेच्या वस्तूंची दुकाने सुरू करण्याची परवानगी दुसऱ्या टप्प्यात दिली जाईल असे समजते आहे. मात्र ही दुकानात दिवसाआड सुरू राहतील.
अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्यात हॉटेल, परमिट रूम, बियर बार दुकानांना निर्बंधांसह उघडण्याची परवानगी मिळण्याची शक्यता आहे. पन्नास टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी मिळू शकते, मात्र शाळा-महाविद्यालयात तूर्तास बंद राहतील. तर मुंबई लोकल गाड्या अनलॉकच्या शेवटच्या म्हणजे चौथ्या टप्प्यात सुरू होऊ शकतील असे समजते आहे.