उद्धव ठाकरेंचं मशाल हे चिन्ह नाहीचय. तो तर थंड आइस्क्रीमचा कोण आहे. त्या माणसातली आग संपली आहे… नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंना धनुष्यबाण हे चिन्ह मिळाल्यानंतर केलेली ही टीका! त्यावर तोंडात घ्या मग चटके बसल्यावर कळेल की, आईस्क्रीम आहे की आगीचा गोळा…. उद्धव ठाकरेंचा राईट हॅन्ड, निष्ठावान मावळा म्हणून ज्यांची ओळख होती त्या रवींद्र वायकरांनी (Ravindra Waikar) दिलेलं हे चोख प्रत्युत्तर….थोडक्यात रवींद्र वायकर हे नाव ठाकरेंच्या नावाशी घट्ट जोडलेलं होतं. पण वायकरांच्या मागे ईडी लागली आणि त्यांनी शिंदे गटात उडी घेतली. याचंच फळ म्हणून की काय त्यांच्या पाठीमागची ईडीची साडेसाती दूर झाली.. इतकच नाही तर शिंदे गटाकडून उत्तर पश्चिम मधून लोकसभेचे अधिकृत उमेदवार म्हणून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तबही झालाय.. त्यामुळे उत्तर पश्चिमची लढत शिवसेना विरुद्ध शिवसेना.. अमोल कीर्तीकर विरुद्ध रवींद्र वायकर… अशी आता फिक्स झालीये. पण वायकरांना तिकीट देऊन शिंदे उत्तर पश्चिमची जागा लढण्याआधीच कसे हरलेत? भाजप, राज ठाकरे आणि शिवसेनेतील अंतर्गत पदाधिकारी देखील वायकरांवर कसे दातओठ खाऊन आहेत? हेच आपण जाणून घेऊयात….
ठाकरेंकडून अमोल किर्तीकर यांना उत्तर पश्चिमची उमेदवारी देऊन चार ते पाच आठवडे उलटत आले तरी शिंदे या जागेवरुन कुणाला मैदानात उतरवणार, याचा काही फैसला लागत नव्हता. गजानन किर्तीकरांनी आपल्या मुलाच्या विरोधात निवडणुकीत उतरायला स्पष्ट नकार दिल्यानं शिंदेंना उत्तर पश्चिमसाठी ताकद लावेल, असा हुकूमी एक्का सापडत नव्हता. सेलिब्रिटी इफेक्ट इथं कामाला येईल का, याचीही शिंदेंनी चाचपणी करुन पाहिली. शरद पोंक्षे, सचिन खेडेकर, सचिन पिळगावकर यांंसारख्या मराठी कलाकारांचीही नावं उत्तर पश्चिमच्या निमित्ताने चर्चेत आली. तसं बघायला गेलं तर अगदी महिन्याभरापूर्वीच ठाकरे गटातून शिंदेंच्या शिवसेनेत आलेल्या रविंद्र वायकरांचं नाव या मतदारसंघासाठी फिक्स समजलं जात होतं. पण वायकरांना भाजपचा असणारा कडवा विरोध अन् मनसेची असणारी नाराजी यामुळे उत्तर पश्चिमच्या उमेदवाराचं भिजत घोंगडं पडलं होतं.
उद्धव ठाकरेंचे कट्टर शिवसैनिक अशी रवींद्र वायकरांची ओळख. शिंदेंनी शिवसेना फोडल्यानंतर बंडखोरी केलेल्या आमदारांना वायकर आपल्या शब्दांनी फोडून काढत होते. पण काळाची चक्र फिरली आणि वायकरांच्या मागे ईडीचा ससेमीरा लागला. मी हाडाचा शिवसैनिक असल्यानं मी आपली निष्ठा कधीच गहाण ठेवणार नाही, असा प्रण केलेल्या वायकरांच्या ईडी चौकशीचा दबाव इतका वाढला की त्यांना नाईलाजाने शिंदेंची वाट धरावी लागली. तेव्हापासूनच उत्तर पश्चिम लोकसभेचा शब्द घेऊनच वायकर शिंदे गटात आलेत, अशी चर्चा होती. पण शिंदे सोडता सर्वांनाच वायकरांना उमेदवारी देणं म्हणजे स्वतःच्या हाताने स्वतःच्या ताटात मिठाचा खडा टाकण्यासारखा हा प्रकार होता. कारण वायकरांनी राज ठाकरेंना अनेकदा डिवचत मनसैनिकांना दुखावलं होतं. शर्मिला ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वीच वायकरांच्या नावाचा उल्लेख न करता इंगा दाखवण्याची भाषा केली होती. स्वतः शिंदे गटातील नेते कार्यकर्ते आणि भाजपचाही वायकरांच्या उमेदवारीला विरोध होता. ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्यावर खिचडी घोटाळ्याचा आरोप आहे. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी हाच धागा पकडत कीर्तीकरांना सळो की पळो करून सोडलय. भ्रष्टाचारी उमेदवार मैदानात उतरवल्याचं हायलाईट करत अमोल कीर्तीकारांची इमेज निगेटिव्ह करण्याचा प्रयत्न महायुतीकडून सुरू आहे. अशा वेळेस महायुतीचा उमेदवार स्वच्छ चारित्र्याचा असणं महत्त्वाचं होतं. पण ज्या वायकरांवर अनेक अफरातफरीचे आणि घोटाळ्याचे आरोप आहेत. त्यांनाच मैदानात उतरवल्यानं आता कोणत्या तोंडाने प्रचार करायचा? हा मोठा प्रश्न शिंदे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना पडला आहे. थोडक्यात मनसे, शिवसेना आणि भाजप या तिन्ही पक्षांची स्पष्ट नाराजी वायकर यांच्या उमेदवारीला होता. पण या सगळ्या विरोधाला जुमानून शिंदेंनी वायकरांना तिकीट देऊन नेमकं काय साध्य केलंय? हे कळायला मार्ग नाही…
वयाच्या पाचष्टीत असणाऱ्या रवींद्र वायकर यांचा साधा शिवसैनिक ते गृह निर्माण राज्यमंत्रीपदापर्यंतचा प्रवास मात्र थक्क करणारा आहे. मुंबई महापालिकेत 20 वर्षे नगरसेवक म्हणून काम करणारे वायकर 1992 मध्ये जोगेश्वरीतून पहिल्यांदा मुंबई महापालिकेवर निवडून आले होते. त्यानंतर ते 2009, 2014 आणि 2019 मध्ये सलग तीनवेळा जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातून निवडून आले आहेत. या काळात ते सलग तीन वेळा मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्षही होते. प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव आणि अभ्यासू नेता अशी त्यांची ओळख. महापालिकेत स्थायी समिती अध्यक्ष असताना शिवसेना भवन आणि शिवालय उभारण्याच्या कामात वायकरांनी मोठी जबाबदारी पार पाडली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची त्यांच्यावर खास मर्जी होती…
पण अनेक आर्थिक गैरव्यवहार आणि आरोपांमुळे ते सतत फोकसमध्ये राहिले. वायकर आणि मातोश्रीचे आर्थिक हितसंबंध असल्याचा पहिला आरोप संजय निरुपम यांनी केला होता. आरे कॉलनीत बेकायदा जिमखाना आणि 40 खोल्या असलेली इमारत बांधल्याचाही आरोपही त्यांच्यावर आहे. रायगड जिल्ह्यातील रेवदंडा नजिकच्या किल्ला कोर्लई इथे रश्मी ठाकरे आणि रवींद्र वायकर यांची पत्नी मनिषा वायकर यांनी नाईक कुटुंबाकडून जमीन घेतल्याचा आरोप करत किरीट सोमय्यांनीही यात उडी घेतली होती. एकामागून एक होत असणाऱ्या आरोपांमुळे वायकर यांची प्रतिमा मलीन झाली होती…
पण शिंदे गटात येण्यासाठी हा सगळा प्रकार सुरु असल्याचं वायकर यांनी अनेकदा स्पष्ट केलं होतं. भाजपला आणि शिंदे गटातील नेत्यांना वायकर चांगलेच झोडत होते. याचाच राग भाजप आणि शिंदेंच्या नेत्यांना होता. पुढे इडीचा फास आवळला गेला आणि वायकरांना शिंदेंसोबत यावं लागलं. वायकर ज्या मतदारसंघातून सलग तीन टर्म आमदार आहेत तिथूनच म्हणजेच उत्तर पश्चिमची खासदारकीची उमेदवारीही त्यांना मिळाली आहे. पण कुठलाच पर्याय नसल्यानं शिंदेंनी इथून वायकरांचा बळी तर दिला नाहीये ना, अशीही चर्चा आता होऊ लागलीय. कारण लोकसभेच्या निम्मिताने मुंबईत दिसणारी ठाकरेंच्या बाजूने असणारी सहानुभूतीची संभाव्य लाट, तीन आठवड्यांपासूनच अमोल किर्तीकरांचा काट्यावर चाललेला प्रचार आणि भाजप – मनसेची वायकरांच्या नावाला असणारा विरोध हे सगळंच वायकरांना निगेटिव्हमध्ये घेऊन जाणारं आहे. मुंंबईत शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत फिक्स झालेली ही दुसरी जागा असताना शिंदेंनी कसलाच अंदाज न घेता जाहीर केलेल्या उमेदवारीमुळे आता राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त केलं जातंय. त्यामुळे राजकीय कचाट्यात सापडलेल्या शिंदेेंना रविंद्र वायकरांची उमेदवारी तारणार का? उत्तर पश्चिम मुंबईचा कौल कुणाच्या पारड्यात पडेल? तुमचं काही मत असेल तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.