नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीच्या सर्व टप्प्यातील मतदानाची सांगता होण्या पूर्वीच विरोधी पक्षांनी सत्ता कमावण्यासाठी हालचाली वाढवल्या आहेत. तेलगु देसम पक्षाचे नेते आणि आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी दिल्लीत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. दोघांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या निकालावर चर्चा झाली आहे अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
राहुल गांधी आणि चंद्राबाबू नायडू यांच्यात बंद खोलीमध्ये अर्धा तास चर्चा झाली आहे. त्यांच्यात नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली तो विषय मात्र अद्याप हि गुलदस्त्यात आहे. परंतु चंद्राबाबू नायडू यांनी राहुल गांधी यांच्या सोबत लोकसभा निवडणुकीच्या निकालावर चर्चा केली असावी असा अंदाज वर्तवला जातो आहे. लोकसभा निकाला नंतर ज्या सत्ता स्थापनेच्या शक्यता आहेत त्या शक्यतांना पडताळून सत्ता कशी हस्तगत करता येईल या बद्दल चर्चा झाली असावी असे बोलले जाते आहे.
दरम्यान २१ मे रोजी नवी दिल्ली या ठिकाणी विरोधी पक्षांच्या नेत्यांची पंतप्रधान पदाचा उमेदवार निवडण्यासाठी बैठक पार पडणार आहे. या मध्ये मायावती, ममता बॅनर्जी आदी नेते सहभागी होणार आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे देखील नाव या वेळी विरोधी पक्षा कडून जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून ममता बॅनर्जी आणि मायावती यांची देखील नावे विरोधी पक्षाकडून पंतप्रधान पदासाठी चर्चेत आहेत.