धक्कादायक! शिवसेनेच्या कथित लेटरहेडवर खासदार नवनीत राणांवर अ‍ॅसिड फेकण्याची धमकी

अमरावती । मागील काही दिवसांपासून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. शेतकऱ्यांच्या समस्या, वाढीव वीजबिल अशा अनेक मुद्द्यवर त्यांनी सरकारवर टीका करत या घटकांना न्याय देण्याची मागणी केली. या पार्श्वभूमीवर नवनीत राणा यांना एक धमकीचे एक पत्र आले आहे. या पत्रात त्यांच्यावर अ‌ॅसीड फेकण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकारची दखल घेत त्यांनी या दिल्लीतील नॉर्थ अव्हेन्यू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

नवनीत राणा यांना आलेले धमकीचे पत्र शिवसेनेच्या कथित लेटरहेडवर असल्यामुळे राणा यांनी शिवसेनेवर थेट आरोप केले आहेत. या पत्रात अर्वाच्य भाषेचा वापर करण्यात आला आहे. तसेच ही धमकी शिवसेना नेते संजय राऊत आणि शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांच्या इशाऱ्यावर पाठविण्यात आल्याचा दावा नवनीत राणा यांनी केला आहे.

दरम्यान, नवनीत राणा यांना आलेल्या धमकीच्या पत्रावर कोणत्याही शिवसेना नेत्याचे नाव नाही. तसेच, हे पत्र शिवसेनेच्या खऱ्या लेटरहेडवर असल्याची कोणतीही पुष्टी अजून झालेली नाही. असे असले तरी नवनीत राणा यांनी तक्रार केल्यानंतर शिवसेनेची काय प्रतिक्रिया येणार हे पाहणे महत्वाचे आहे.

You might also like