हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोणावळामध्ये (Lonavala) फिरायला जाणाऱ्या पर्यटकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बुधवारी लोणावळा शहरात २४ तासात २८० मिमी इतका विक्रमी पाऊस पडला आहे. त्यामुळे यावर्षीच्या हंगामात झालेला हा सर्वाधिक पाऊस ठरला आहे. या अधिवृष्टीमुळे प्रशासनाने लोणावळा शहरातील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. त्याचबरोबर, नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.
लोणावळ्याबरोबर मुळशी येथे ८२ मिमी तर जुन्नरमध्ये ६७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. भारतीय हवामान खात्याने पुणे जिल्ह्यासाठी २२ जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच पुणे जिल्ह्यातील अवघड भागातील शाळा २० आणि २१ जुलैला बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. वाढत्या अतिवृष्टीचे परिणाम बघता प्रशासनाने ही पावले उचलली आहेत. मुख्य म्हणजे, मुसळधार पावसामुळे लोणावळा धरणाच्या पाण्याच्या पातळीतही वाढ झाली आहे.
गेल्या २४ तासात धरणात सुमारे ३.९० टीएमसी पाण्याची भर पडली असून ते क्षमतेच्या ७०.४४ टक्के पेक्षा जास्त भरले आहे. या पाण्याचा धोका पर्यटकांसाठी निर्माण झाला आहे. अशा स्थितीत लोणावळ्यामध्ये फिरायला जाणे पर्यटकांसाठी धोक्याचे ठरत आहे. जरासा पाऊस सुरू राहिला तर शहरात पाणी साठण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढील ४ दिवसात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी महत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन लोणावळा नगरपरिषद प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
लोणावळा घाटात दरड कोसळण्याच्या देखील घटना घडल्या आहेत. त्यामुळे या सर्व स्थितीचा आढावा घेत प्रशासनाने खबरदारी घेण्यास सांगितले आहे. पश्चिम भागात मुसळधार पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर गेल्या दोन दिवसांपासून रत्नागिरी, चिपळूण मध्ये देखील पूरस्थिती सदृश्य निर्माण झाले आहे.