सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
एमआयडीसी रस्त्यावरील नगरपालिका कचरा डेपोच्या बाहेरील परिसरात कचरा टाकल्यास वाई नगरपालिका प्रशासन सहकार्याने स्थानिक रहिवाशी संयुक्तरित्या कचरा टाकणाऱ्या व्यक्ती व वाहनांवर कडक कारवाई करणार असल्याचे संकेत येथील रहिवाशांनी दिले आहेत. वाई नगरपालिका कचरा डेपोमधील धुराचे लोट व मुख्य रस्त्यावर पडलेल्या कचऱ्याचे ढिगाऱ्यामुळे स्थानिक रहिवाशी व परिसरातील सुलतानपूर, लोहारे, बोपर्डी व एमआयडीसीकडे जाणाऱ्या प्रवाशी व ग्रामस्थांना नित्याचाच त्रास सहन करावा लागत आहे. यावर नगरपालिका प्रशासनाने कायमचे निर्बध घालून कडक कारवाई करावी, यासाठी लोहारे गावचे माजी उपसरपंच दत्तात्रय ढेकाणे यांच्या नेतृत्वाखाली स्थानीक रहिवाशांनी मुख्याधिकारी किरण मोरे यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली.
रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत कचरा डेपोच्या बाहेरील काळुबाई मंदिर ते शव विच्छेदनगृह परिसरात वाई शहर व परिसरातील मटण-चिकन विक्रेते काही हॉटेल व्यावसायिक व शहरालगतच्या काही ग्रामपंचायत कचरा गाड्या अनधिकृतपणे कचरा आणून टाकत आहेत. तर एमआयडीसीत जाणारे काही कामगार कचऱ्याच पिशव्या टाकून भर घालत आहेत. या परिसरातील रहिवासी, शेतकरी व प्रवाशांना हा त्रास सहन करावा लागत, असून अनेकांना आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. या बाबींचा गांभीर्याने विचार करून नगरपालिका प्रशासनाने कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांमधून जोर धरत जात आहे.
वाई एमआयडीसी लगत 72 वर्षांपासून कचरा डेपो कार्यरत आहे. यामध्ये संपूर्ण वाई शहरातील कचरा जमा केला जातो. सद्यस्थितीत ओला, सुका कचरा वेगवेगळा गोळा केला जात असून त्याच्यावर खत प्रक्रिया करण्याचे काम गतीमान आहे. परंतु काही विघ्नसंतोषी लोक कचऱ्याला आग लावून वातावरण प्रदूषित करत आहेत. तर काहीजण रात्रीच्या वेळी डेपो बाहेर कचरा टाकून जाणीवपूर्वकघाणीचे साम्राज्य तयार करत आहेत. कचरा डेपोची आग विझविण्यासाठी प्रशासन शर्तीचे प्रयत्न करत आहेत. याला आळा घालण्यासाठी स्थानिक रहिवाशी व लगत ग्रामस्थांनी पुढाकार घेवून कचरा टाकणाऱ्या व्यक्ती व वाहने यांची माहिती कळवणे गरजेचे आहे. भविष्यात या सर्वांच्या सहकार्याने कचरा डेपो परिसरात अनाधिकृतपणे कचरा टाकणाऱ्या व्यक्ती व वाहन चालकांवर कडक दंडात्मक कारवाई करणार असल्याचे आश्वासन वाई नगरपालिका मुख्याधिकारी किरण मोरे यांनी तक्रार रहिवाशांना यावेळी दिले.
यावेळी ज्ञानेश्वर कांयगुडे भाजपा सरचिटणीस वाई, तालुका मा. सरपंच सुलतानपूर, मयूर गाढवे भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष, सौ. कल्पना करपे, कृष्णां करपे, सौ. कुसुम जगताप, सौ. पुजा करपे, सौ. जयश्री जगताप, सौ. कल्याणकर, हिरामण माव्हरे, शरद बनकर व रहिवाशी उपस्थित होते