‘जरा विसावू या वळणावर’ | सचिन देशपांडे
मधुसुदन साठे हाॅस्पिटलच्या स्पेशल रुममध्ये, डोळे बंद करुन पडले होते बेडवर. खूप हलकं वाटत होतं त्यांना आता… कारण नाका – तोंडातल्या नळ्या काढल्या होत्या… Intravenous drip काढली होती… औषधं – गोळ्या सगळं बंद केलं होतं डाॅक्टरांनी. ऐंशी वर्षांचे साठे अगदी पहिल्यापासूनच जाणून होते, त्यांच्या लंग्ज कॅन्सरबद्दल. त्यामुळे गेली दोन वर्ष ते ह्या आजाराशी, अगदी जाणतेपणाने लढले होते. ती सगळी सिटिंग्ज, ते सगळे पेट स्कॅन सेशन्स… अंगाचा दाह करणार्या, त्या सगळ्या असुरी गोळ्या… या सगळ्याला मोठ्या धिराने तोंड दिलं होतं साठेंनी. त्यामुळेच त्यांच्यापासून अजिबात न लपवता… त्यांच्या देखतच त्यांच्या मुला – सुनांना सांगितलं होतं डाॅक्टरांनी, की शेवटचे दोन – चार दिवस बस्स. त्यांना आता हवं तसं जगूद्या, हवं ते करुद्या… घरी घेऊन जायलाही परवानगी दिली होती डाॅक्टरांनी त्यांना. थोडक्यात साठेंचा क्लायमॅक्स सीन चालू झाला होता, तो ही शेवटच्या टप्प्यातला… ‘दि एन्ड’ चा बोर्ड लागण्याच्या, किंचीत आधीचा.
दोन्ही मुलांनी एकत्रीत रित्या विचार – विनिमय करत त्यांच्या बाबांना, त्यांच्या स्वतःच्या घरी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. दोन्ही भाऊ आॅफिसमधून सुट्टी घेऊन… बाबांसोबत रहाणार होते, त्यांचे ऊरलेले दिवस. मधुसुदन साठेंना घरी आणण्यात आलं… त्यांच्या प्रशस्त बेडरुममधील त्यांच्या आवडत्या सागवानी पलंगावर, त्यांना झोपवण्यात आलं. दोन्ही सुना आपापली बच्चे कंपनी सांभाळून, येऊन – जाऊन असणार होत्या. दादरच्या हिंदू काॅलनीतील साठेंच्या त्या चार खोल्यांच्या प्रशस्त घरात, जागा कमी पडण्याचा प्रश्नच नव्हता. आणि मुख्य म्हणजे साठेंच्या दोन्ही मुला – सुनांच्या मनात, अगदी ऐसपैस जागा होती… त्यामुळे भौतिक जागेची अडचण जरी असती, तरी ती प्रेमाने निभावून नेण्यात आली असती.
तर दुसर्या दिवशी अशीच सकाळची दोन्ही मुलं, साठेंजवळ बसली होती. थोरला त्यांना ‘Times’ वाचून दाखवत होता… तर धाकटा एकीकडे त्यांना, मॅश केलेलं सफरचंद चमच्याने भरवत होता. आणि मध्येच साठेंनी दोन्ही हातांनी टाळी वाजवली. ही चालू असलेलं काम, तातडीने थांबवायची खूण असे त्यांची. त्याप्रमाणे दोन्ही मुलं थांबली… साठेंनी घसा खाकरला… नॅपकीनने तोंड पुसलं… नी बोलू लागले ते…
“डाॅक्टरनी सांगितलय ना, की मला माझ्या मर्जीने ऊरलेले दिवस जगूद्या… मग प्लिज एक काम कराल माझं?… तिला बोलवाल… ईथे… माझ्यापाशी… मी असेपर्यंत”.
दोन्ही मुलं संभ्रमीत होऊन, गप्प बघत राहिली बाबांकडे… साठे पुढे बोलू लागले…
“अरे ती… मंजिरी चितळे… माझी काॅलेजमेट… माझी… माझी एक्स”.
साठेंच्या दोन्ही मुलांच्या घशांना, ऐकुनच कोरड पडली… आणि दोघंही एकत्रच ओरडले…
“बाबा… काय?”.
साठेंनी कंटिन्यू केलं मग…
“काॅलेजची चार वर्ष आमचं प्रकरण चालू होतं… आणि ते संपलंही, अगदी काॅलेज संपतांनाच… मंजिरीचे वडिल प्रख्यात न्युरो सर्जन होते… प्रस्थ जरा बडंच होतं… तिची आईही त्या काळची डबल ग्रॅज्युएट होती… ऊच्च विद्या विभुषीत… आणि एक नावाजलेली सोशल वर्कर… पण आमच्या रिलेशनबाबत मात्र, सोशल नाही होऊ शकल्या त्या… एका शाळा मास्तर वडिलांचा… नी घरी बसुन फक्त रांधा – वाढा, ऊष्टी काढा ह्यातच सुखी असणार्या आईचा मुलगा… त्यांच्या ईभ्रतीला शोभणारा नव्हता… त्यामुळे आमचं लग्न काही चितळ्यांकडच्यांनी होऊ दिलं नाही… आम्ही एकदा भेटलो मग बाहेर… गिरगाव चौपाटीवर बसलो… अगदी सुर्य अस्ताला जाईपर्यंत… निरोप घेतला मग आम्ही एकमेकांचा… आणि तिथुनच वाटा वेगळ्या झाल्या आमच्या… त्या दिवशीची माझ्या पॅन्टला चिकटलेली वाळूही, मी थेट घरी येऊनच झाडली होती”.
ऊशीखालून एक प्लास्टिकची डबी बाहेर काढली साठेंनी… आणि दाखवली त्यातून आजही जपून ठेवलेली, ती चौपाटीची वाळू. दोन्ही मुलं अजूनही शाॅकमध्येच होती… साठे पुन्हा पुढे सरकले…
“लग्नाच्या आधीच तुमच्या आईला, मी सगळं सांगितलं होतं बरं… हे ही सांगितलं की आपलं घर सोडून… निव्वळ माझ्यावर विश्वास दाखवून जी मुलगी माझ्या घरी येईल, तिच्याशी मी जन्मात प्रतारणा करणार नाही… आणि मी राहिलो बरं का लाॅयल तुमच्या आईशी… ती होती तेव्हा… आणि ती नव्हती तेव्हाही… पन्नासचा होतो मी, जेव्हा आई गेली तुमची… पण मग मी सारं लक्ष माझं, तुमच्यावर केंद्रीत केलं… मंजिरीला भेटायचा, तिच्या संसारात डोकावायचा… विचारही कधी शिवला नाही, मनाला माझ्या… तुमच्या आईला दिलेला शब्द, मी शेवटपर्यंत पाळला… पण आता… आता… मंजिरीला दिलेला शब्द… किंबहूना आम्ही एकमेकांना दिलेला शब्द पाळायची वेळ आलीये रे… आपल्या दोघांपैकी जो कोणी आधी शेवटचा श्वास घेईल… त्याने किंवा तिने… मृत्युची चाहूल लागताच, दुसर्याला बोलवायचं… नी भरपुर गप्पा मारायच्या… भरपुर रडायचं… असं ठरलं होतं आमचं, त्या आमच्या शेवटच्या भेटीत… आणि आता माझा शेवट आलाय… वेळ खूपच कमी आहे… तुमच्या ह्या बापाची ही शेवटची ईच्छा पुर्ण कराल?… शोधाल मंजिरी चितळेला… माझ्यासाठी?”.
साठेंनी आपले गोरेपान… सुरकुतलेले… हिरव्या शिरा दिसणारे हात, जोडले मुलांकडे बघून. दोन्ही मुलांनी बाबांचा नमस्काराचा हात, घट्ट पकडला होता मग. दुसर्या दिवशी संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळेलाच… साठेंच्या खोलीतला दिवा लावला, तोच मुळी मंजिरी चितळेंनी. साठे आणि मंजिरी एकमेकांकडे बघून, मोकळेपणे रडू लागले. मंजिरी बाई पुढे येत… साठेंच्या पलंगावर त्यांच्या बाजूला बसल्या. दोघेही एकटक बघत होते एकमेकांकडे… अन् जिवण्या हसत असतांना दोघांच्या, दोन जोड डोळे मात्र भरभरुन वहात होते. रात्रभर साठेंच्या बाजूला बसून मग, मंजिरी बाईंनी भरपुर गप्पा मारल्या साठेंशी. कुठल्याशा कपाटावर असलेल्या… ट्रंकेच्या तळाशी ठेवलेल्या… पुस्तकावरची जमा धुळ, ऊडली होती बर्याच वर्षांनी… आणि अगदी पान न् पान लख्ख झालं होतं. साठेंच्या आग्रहाखातर आपल्या गोड गळ्याने… गाणंही म्हंटलं मंजिरी बाईंनी, पहाटेचं तांबडं फुटता फुटता… अगदी साठेंच्या मुला – सुनांना बोलावून घेऊन… साठेंच्याच ईच्छेनुसार.
भले बुरे जे घडून गेले
विसरून जाऊ सारे क्षणभर
जरा विसावू या वळणावर.. या वळणावर
कसे कोठुनी येतो आपण
कसे नकळता जातो गुंतून
उगाच हसतो उगाच रुसतो
क्षणात आतुर क्षणात कातर
जरा विसावू या वळणावर.. या वळणावर
खेळ जुना हा युगायुगांचा
रोज नव्याने खेळायाचा
डाव रंगता मनासारखा
कुठली हुरहुर कसले काहूर
जरा विसावू या वळणावर.. या वळणावर
भले बुरे जे घडून गेले
विसरु…
आणि अचानकच मंजिरी बाईंना जाणवला होता… भरुन आलेला निर्जिवपणा, साठेंच्या डोळ्यांतून. गाणं समेवर येण्याआधीच साठेंचं जिवनगाणं, मागच्या वळणावरच साथ सोडून गेलं होतं सगळ्यांची, जराही न विसावता. मंजिरी बाईंनी मोठ्या धिराने बंद केले, साठेंचे ऊघडे डोळे आपल्या मऊशार हाताने. तोच त्यांचा… त्यांना झालेला… पहिला स्पर्श होता. जायला निघाल्या त्या… आणि दोन्ही मुलांनी मंजिरी बाईंना हात जोडले. मंजिरी बाईंनी दोघांचेही हात पकडत, त्यांचेच आभार मानले… नी तडक निघून गेल्या त्या. आपापल्या बायकांच्या डोळ्यांतील प्रश्नचिन्ह ओळखत, दोन्ही भाऊ बोलले…
“एका अटीवर मंजिरीबाई बाबांना भेटायला तयार झाल्या होत्या… वचन घेतलं होतं त्यांनी आमच्याकडून, बाबांना कळू न देण्याचं की… की… त्यांनी आजतागायत लग्न केलं नव्हतं. एक जिव भरलं घरटं सोडून गेला होता… तर एक जिव परतला होता, आठणवणींच्या काड्यांनी बांधलेल्या… आपल्या एकाकी घरट्यात.
दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.