औरंंगाबाद : शहर आणि परिसरात रविवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. दिवसभर कडक ऊन आणि कमालीचा उकाडा जाणवत असताना रविवारी (दि.६) सायंकाळी आकाशात काळे ढग दाटून आले. अन् काही वेळातच वातावरण पालटून विजांच्या कडकडाटात जोरदार पावसाला सुरुवात झाली.
वीस मिनिटानंतर पावसाचा जोर चांगलाच वाढला होता. ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटात पावसाने जवळपास तासभर शहराला धुवून काढले. जोरदार पावसामुळे शहराच्या विविध भागातून वाहणाऱ्या नाल्यांना पूर आला होता. तर सखल भागात पावसाच्या पाण्याचे तळे साचले होते. गेल्या सात ते आठ दिवसांपासून औरंगाबाद शहर परिसरात एकसारखा पाऊस पडत आहे. केरळात मान्सून दाखल झाला असला तरी अद्याप आपल्याकडे पोहोचायला त्याला विलंब लागणार आहे.
रविवारी दिवसभर आकाशात उन्हाचा आणि काळ्या ढगांचा लपंडाव सुरू होता. दुपारी दोन वाजेच्या सुमारास पावसाने शहर परिसरात हजेरी लावली होती. त्यानंतर कडक उन्ह पडले होते. सायंकाळच्या वेळी पाच वाजेनंतर शहरावर पुन्हा काळ्याकुट्ट ढगांनी गर्दी करण्यास सुरूवात केली. सायंकाळी सात वाजेच्या सुमारास विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटात पावसाला सुरूवात झाली. जवळपास तासभर कोसळत असलेल्या पावसाने अनेकांची चांगलिच फजिती केली होती.