LPG सिलेंडरच्या दरात पुन्हा वाढ; सर्वसामान्यांना मोठा फटका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आजपासून वर्षातील शेवटचा महिना म्हणजेच डिसेंबर महिना सुरू झाला आहे. परंतु डिसेंबर महिन्याच्या 1 तारखेलाच ग्राहकांना मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. 5 राज्यांच्या निवडणुका संपल्यानंतर 1 डिसेंबर रोजी LPG सिलेंडरचे दर वाढले आहेत. आजपासून एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत 41 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे या महिन्यांत नागरिकांच्या खिशाला मोठा चाप बसणार आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात 41 रुपयांनी वाढ केली आहे. ही वाढ 19 Kg व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या करण्यात आली आहे. त्यामुळे, दिल्लीत एलपीजीच्या एका सिलेंडरची किंमत 1796.50 रुपये झाली आहे. तसेच मुंबईत, एलपीजी सिलेंडरची किंमत 1749.00 रूपये झाली आहे. यापूर्वी एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत 1728.00 रूपये होती.

प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला व्यवहारात मोठे बदल होत असतात. आज 1 तारीख असल्यामुळे एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये देखील हे बदल पाहायला मिळाले आहेत. महत्वाचे बाब म्हणजे, दिल्लीत छठ पुजेच्या निमित्ताने गॅस सिलेंडरच्या किमती पन्नास रुपयांनी कमी करण्यात आल्या होत्या. मात्र आता वर्षाच्या शेवटच्या महिन्यात पुन्हा या किमती वाढवण्यात आल्या आहेत. व्यावसायिक सिलेंडरचे दर 41 रुपयांनी वाढल्यामुळे सर्वसामान्यांना याचा फटका बसला आहे.

दरम्यान, व्यावसायिक सिलेंडरच्या किमती वाढल्या असल्या तरी घरगुती सिलेंडरच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. IOCL ने दिलेल्या माहितीनुसार, या महिन्यात दिल्लीत घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 930 रुपये आहे. कोलकतामध्ये 929 आणि मुंबईत 902.50 रूपये इतकीच आहे.