सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
नगरपालिकेत सभापती असूनही कामे होत नसून सातारा विकास आघाडीकडून केवळ आश्वासने दिली जात आहेत. आघाडीचे नेते खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनाही चुकीची माहिती दिली जाते. त्यांना फसवले जाणे पाहत बसणे हे त्यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाचा घात केल्यासारखा आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारकीचा राजीनामा दिला होता. तोच आदर्श समोर ठेवून बांधकाम सभापतिपदाचा राजीनामा देत आहे. मी काही माधवी आक्का कदम नाही, स्वार्थासाठी खुर्चीला चिटकून निर्लज्जपणे बसायला म्हणून मी राजीनामा देत असल्याचे सातारा नगरपालिकेच्या नगरसेविका सिद्धी पवार यांनी जाहीर केले.
प्रभागातील कामे होत नसल्याने तसेच नगरपालिकेतही डावलले जात असल्याने बांधकाम सभापती सिद्धी पवार या नाराज आहेत. त्यातच ठेकेदारासोबत झालेली संभाषणाची वादग्रस्त ऑडिओ क्लिप शुक्रवारी व्हायरल झाली. सिद्धी पवार यांनी दोन महिन्यांपूर्वीच न.पा. तील कामकाजावर नाराज होऊन सातारा विकास आघाडीचे नेते खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्याकडे पदाचा राजीनामा दिला होता. हा राजीनामा त्यांनी शनिवारी जाहीर केला. सोमवारी जिल्हाधिकारी शेखर सिंह तसेच नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याकडे त्या पदाचा राजीनामा देणार आहेत.
खा. उदयनराजे यांच्याकडे दिलेल्या राजीनाम्यात त्यांनी म्हटले आहे. गेली चार वर्षे विविध प्रश्न पोटतिडकीने मांडले. भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ युनियन क्लबजवळ अटल स्मृती उद्यान व्हावे ही इच्छा आहे. मात्र या प्रकल्पात इतकी दिरंगाई होऊन राजकारण आणणे, त्यासंदर्भातील फायली गायब होणे वेदनादायी आहे. सर्व प्रकारची खरी माहिती मिळत नाही. त्यावर दंगा अन् गदारोळ झाल्यावरच आपल्याला माध्यमांतून सर्व गोष्टी कळतात. तुमच्या नावाखाली अनागोंदी कारभार सुरु आहे. महाराजांनी सांगितले आहे, मालकांनी सांगितले आहे हे करु नका, तो विषय नको, इकडे-तिकडे जास्त बोलू नका. यांना भेटू नका, त्यांच्याशी बोलू नका असे हास्यास्पद चित्र आहे. सभापती असूनही मला खेळवत ठेवणे, माझे कोणतेही विषय न करणे, एकाने मारल्यासारखे तर दुसऱ्याने रडल्यासारखे करायचे. तुमचे विषय पुढच्या यादीत घेतले असे करत ४ वर्षे पूर्ण झाली. उर्वरित काळात अटल स्मृती उद्यान, त्याची रिटेनिंग वॉल, भोईटे बोळाचा रस्ता आणि इतर रस्ते, पोहण्याचा तलाव ही कामे होणार नसतील तर मी बांधकाम सभाप शोभेचे पद काय कामाचे? सातारा विकास आघाडीतीलच काहीजण तुम्ही सांगितले आहे की त्यांचे काम करु नका, त्यांना खेळवत ठेवा, मग बघू पुढे काय करायचे ते म्हणून सिध्दी पवार यांची कामे होत नाही. ही बदनामी कोणाची? तुम्हाला फसवताना बघत बसणे म्हणजे मी मतदारांचा तसेच आपण माझ्यावर ठेवलेल्या विश्वासाचा घात केल्यासारखे आहे, असेच कारण आपणही घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारकीचा राजीनामा दिला होता. तोच आदर्श घेऊन मी या पदाचा नाईलाजाने राजीनामा देत असून तो स्वीकारावा, अशी मागणी सिद्धी पवार यांनी केली आहे.