मुंबई : हॅलो महाराष्ट्र – ऑनलाईन गेम पबजीच्या नादात एका तरुणीला आपला जीव गमवावा लागला आहे. मृत तरुणी 15 दिवसांपूर्वीच गावातून शहरामध्ये आली होती. त्यानंतर तिला ऑनलाईन गेमचं व्यसन लागलं, हा ताण सहन न झाल्यानं तिनं आत्महत्या केली असावी असा दावा तिच्या कुटुंबियांकडून करण्यात आला आहे. हि घटना मध्य प्रदेशातील इंदूर या ठिकाणी घडली आहे.
आत्महत्या केलेल्या 20 वर्षीय तरुणीचे नाव राधा उर्फ रक्षा असे आहे. राधा 15 दिवसांपूर्वीच कॉम्पयुटरचा कोर्स करण्यासाठी गावातून इंदूरमध्ये आली होती. त्याचबरोबर ती फर्स्ट इयरमध्ये शिकत होती. घटनेच्या दिवशी राधानं संध्याकाळी तिचा भाऊ संजयला किराणा आणण्यासाठी घराबाहेर पाठवलं होतं. संजय अर्ध्या तासानंतर परत आला त्यावेळी तिनं आत्महत्या केली होती.
‘राधाला पबजी गेम खेळण्याचं व्यसन लागलं होतं. ती सतत मोबाईलवर हा गेम खेळण्यात मग्न असे. ती गेल्या एक-दोन दिवसांपासून तणावात होती. तिच्या मोबाईलवर कंपनीचे व्हॉट्सअप कॉलही आले होते,’ अशी माहिती राधाचा भाऊ संजय याने दिली आहे. राधाचा मोबाईल पुढील तपासासाठी पोलिसांना दिला आहे, असंदेखील संजयने सांगितले आहे. राधाच्याजवळ कोणत्याही प्रकारची सुसाईड नोट सापडली नाही. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.