सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
राज्यात एकाबाजूला उष्णतेची लाट पसरली असताना राज्याचे मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेलं महाबळेश्वर मात्र दाट धुक्यात हरवले आहे. या ठिकाणी निसर्गाचा अनोखा अविष्कार पहायला मिळत आहे. वातावरणात होत असलेल्या बदलामुळे महाबळेश्वरात सकाळी व सायंकाळी धुक्याची दुलई पसरत आहे. या ठिकाणी पडणाऱ्या थंडीचा आनंद लुटण्यासाठी राज्यभरातून पर्यटक दाखल होत आहेत.
महाबळेश्वर हे नाव जरी ऐकलं कि प्रथम डोळ्यासमोर चित्र उभं राहते ते दाट धुके, निसर्गरम्य वातावरण, सायंकाळचा सूर्यास्त होय. बाराही महीने थंडीचे वातावरण या ठिकाणी असल्यामुळे येथे विविध राज्यांमधून लाखो पर्यटकी येतात. त्यातून या ठिकाणी असलेल्या बाजारपेठेत खरेदी विक्रीतून दररोज कोट्यवधींची उलाढाल होते.
सध्या या ठिकाणी सकाळ व सायंकाळच्या वेळी धुक्याची दुलई निर्माण होत असल्यामुळे महाबळेश्वरच्या वेण्णालेक तलाव आणि पाचगणीच्या टेबल लँड येथे पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. या ठिकाणी पसरलेल्या धुक्याची दुलईचा पर्यटकही नौकाविहार करताना मनमुराद आनंद लुटत आहेत.