व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

महाबळेश्वर, कास पर्यटकांसाठी खासच : सलग सुट्ट्यांमुळे फुल्ल गर्दी

सातारा | सातारा जिल्ह्यातील जागतिक वारसा स्थळ असलेले कास पुष्प पठार आणि महाबळेश्वर ही पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी नेहमीच खास राहिली आहेत. कास पठारावरील फुलांच्या हंगामाचा शुभारंभ झाल्यानंतर पहिल्या दोन दिवसात सलग सुट्ट्यांमुळे 4 हजार पर्यटकांनी कासला वर्षातील पहिली भेट दिली. तर मिनी काश्मीर असलेल्या महाबळेश्वरलाही शेकडो पर्यटकांनी भेट दिली.

कास पठारावर यंदाच्या हंगामाचा शुभारंभ मुख्य वनसंरक्षक रामानुज यांच्या हस्ते झाला. यावेळी सातार्‍याचे प्रभारी उपवनसंरक्षक उत्तम सावंत, सहाय्यक वनसंरक्षक सुधीर सोनवले, वनक्षेत्रपाल रंजनसिंह परदेशी, डॉ. निवृत्ती चव्हाण, माजी जि. प. सदस्य राजू भोसले, माजी नगरसेवक रवी ढोणे, श्रीरंग शिंदे, 22 गाव समाज अध्यक्ष राम पवार, के. के. शेलार, कास पठार कार्यकारी समिती उपाध्यक्ष दत्तात्रय किर्दत, माजी अध्यक्ष सोमनाथ जाधव यांच्यासह कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

कास पठारावर सध्या डोसेरा, गेंध, चवर, सितेची आसवे,तेरडा, नीलिमा, आभाळी, नभाळी, आबोलिमा, दिपकाडी, मंजरी, कुमुदिनी,कंदील पुष्प या फुलांचा बहर पहावयास मिळत आहे. कास पुष्प पठारासह पर्यटकांनी कास परिसरातील कास धरण, भांबवली वजराई धबधबा, बामणोली, शेंबडी, मुनावळे येथील बोटिंगचा आनंद लुटला. काही पर्यटकांनी नव्याने सुरू करण्यात आलेला मुनावळे धबधबा पाहण्याचा आनंद घेतला.

महाबळेश्वर पर्यटकांनी गजबजले

गणेशोत्सव तसेच शनिवार, रविवार अशा सलग आलेल्या सुट्टयांमुळे महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. जगप्रसिध्द पर्यटनस्थळ महाबळेश्वर पर्यटकांनी गजबजले होते. पर्यटकांनी येथील विविध पॉईंटना भेटी देवून निसर्गाचा मनमुराद आनंद लुटला. येथील निसर्गरम्य वातावरणात पर्यटक गरमागरम भजी, मका कणीस, मका पकोडा खाण्याबरोबरच चहाचा आस्वाद घेताना दिसले. अगदी अबालवृद्धांसह तरुण, तरुणींची विविध पॉईंटवर गर्दी झालेली आढळली. प्रसिद्ध वेण्णा लेकवरही नौकाविहाराचा आनंद अनेक पर्यटकांनी घेतला. मुख्य बाजारपेठेत गरमागरम चणे, चिक्की फजसोबतच उबदार ब्लॅकेट, कानटोपी, मफलर, येथील प्रसिद्ध चप्पल्स खरेदीचा आनंद अनेक पर्यटकांनी लुटला.