कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
शहरातील लक्षणे नसलेल्या कोरोना रूग्णांना घरी स्वतंत्र विलिगीकरणाची सोय नाही. अशा नागरीकांसाठी पालिकेच्या वतीने विलिगीकरण कक्षाची सोय करण्यात आली आहे. यासाठी पालिकेने दोन हॉटेल ताब्यात घेतली असुन ही सोय नाममात्र शुल्क घेण्यात येणार असल्याची माहीती पालिकेच्या नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. या वेळी नगरसेवक कुमार शिंदे हे देखिल उपस्थित होते.
कोरोनाचा कहर जिल्हयात सुरूच आहे, रूग्णासाठी बेड शोधण्यासाठी प्रचंड धावपळ करावी लागत आहे. कोरोनाची लागण झाली आहे परंतु कोणतीही लक्षणे दिसत नाहीत अशा रूग्णांना विलिगीकरणात राहण्यास सांगितले जात आहे. परंतु अनेक कुटूंबात अशी स्वतंत्र सोय करणे अशक्य होत आहे. अशा रूग्णांसाठी मागील वर्षी येथील पर्यटन विकास महामंडळाच्या इमारतीमध्ये कोरोना केअर सेंटर तयार करण्यात आले होते. परंतु, आता ते सेंटर बंद करण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील कोरोना रूग्णांची मोठी गैरसोय होत आहे. या संदर्भात अनेक नागरीकांनी पालिकेला कोरोना केअर सेंटर सुरू करण्याची मागणी केली होती. या मागणीचा पालिकेने गांभिर्याने विचार करून लक्षणे नसलेल्या कोरोना ग्रस्त रूग्णांची भटकंती होवु नये या साठी तसेच कोरोना ग्रस्त रूग्णांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागु नये या साठी विलिगीकरणाची सोय करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. अशी माहीती नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांनी दिली.
शहरातील उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या पाहता सध्या दोन हॉटेल पालिकेने ताब्यात घेतली आहेत. मागणी नुसार आणखी दोन हॉटेल पालिका ताब्यात घेवुन तेथेही विलिगीकरण कक्ष सुरू करणार असल्याची माहीती देवुन नगराध्यक्षा स्वप्नालि शिंदे म्हणाल्या की, विलिगीकरण कक्षात प्रवेश मिळावा या साठी पालिकेने नाममात्र फि ठेवली आहे. 17 दिवसांच्या सोईसाठी कोरोना बाधित रूग्णांना 5 हजार रूपये आकार ठेवण्यात आला आहे. या पाच हजार रूपयांत 17 दिवस निवासाची सोय त्याच बरोबर दोनवेळचा नाश्ता व जेवणाची सोय करण्यात आली आहे. या शिवाय एक होम आयसोलेशन किट देण्यात येणार आहे. या आयसोलेशन किट मध्ये रूग्णांसाठी आवश्यक असलेल्या सर्व वस्तु देण्यात आल्या आहेत. ऑक्सीमिटर, थर्मा मिटर, हातमोजे, मास्क, साबण, सॅनिटायझर आदि वस्तु या किट मध्ये असणार आहेत.
पालिकेच्या वतीने रोज डॉक्टर रूग्णांची तपासणी करणार असुन त्यांना आवश्यक्ते नुसार औषधे दिली जाणार आहेत. रूग्णांनी विलिगीकरण कक्षात येताना केवळ आपल्या बरोबर कपडे, टॉवेल व पांघरून आणायचे आहे. विलिगीकरण कक्षात प्रवेशा साठी रूग्णांनी अथवा नातेवाईकांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह पालिकेच्या नगराध्यक्षा, मुख्याधिकारी व लिपिक यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन देखिल नगराध्यक्षा स्वप्नालि शिंदे यांनी केले आहे.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा