Tuesday, June 6, 2023

महाबळेश्वर पालिकेची कचऱ्यांच्या वर्गीकरणांसाठी क्यूआर कोड प्रणाली

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषद व हिलदारी यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात ‘महामारीच्या काळात कचरा वर्गीकरणाचे महत्व’ याविषयी जनजागृतीसाठी नाविन्यपूर्ण डिजिटल उपक्रम राबविण्यात येत आहे. सद्यस्थितीतील कोरोनाची स्थिती लक्षात घेता नागरिकांच्या आरोग्यासोबतच, निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण, कचऱ्याचे ०४ भागात (ओला, सुका, घातक व बायोमेडिकल कचरा) वर्गीकरण, कचऱ्याचा संपूर्ण प्रवास, कचऱ्याचे आरोग्यावर होणारे परिणाम या सर्व बाबी विचारात घेणे आवश्यक आहे.

नागरिकांनी घरातील कच-याचे योग्यरीत्या वर्गीकरण केले. तर यामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासोबतच आपल्या शहराचे आरोग्यसुद्धा चांगले राखण्यास मदत होईल. या उपक्रमांतर्गत शहरातील सर्व कचरा संकलन करणाऱ्या घंटागाड्या, अत्यावश्यक सेवेअंतर्गत उघडी असणारी दुकाने व इतर ठिकाणी क्यू.आर. (QR) कोड उपलब्ध करून दिला जाणार आहे. तसेच या उपक्रमाची लिंक व्हाट्सएप वर सुद्धा पाठवण्यात येईल. सदर QR कोड स्कॅन केल्यावर किवा लिंक वर क्लिक केल्यावर या उपक्रमांतर्गत कोविड – १९ व कचरा वर्गीकरणाबाबत तयार करण्यात आलेली प्रश्नावली व त्याच्या उत्तराचे ४ पर्याय दिसतील. विचारलेल्या प्रश्नांची बरोबर उत्तरे देणाऱ्या नागरिकांना नगरपरिषदेमार्फत डिजिटल सहभाग प्रमाणपत्र सुद्धा मिळणार आहे. महत्वाचे म्हणजे कोविड – १९ व कचरा वर्गीकरणाबाबतची महत्वाची व अद्ययावत माहिती ज्या इच्छुक सहभागींना हवी आहे. त्यांच्यासाठी तयार करण्यात आलेल्या व्हाट्सएप ग्रुपची लिंक उपक्रमाच्या शेवटी दिलेली आहे.

शहरातील नागरिकांनी सदर उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी केले आहे. या उपक्रमासाठी नगराध्यक्षा स्वप्नाली कुमार शिंदे, उपनगराध्यक्ष अफजलभाई सुतार, सर्व सन्माननीय सदस्य आणि नगरपरिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले आहे.