कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी
महाराष्ट्राला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाण्यासाठी कोयना विद्युत प्रकल्प उभारण्यात आला आहे. परंतु आता महावितरण कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका या प्रकल्पाला बसल्याचे दिसत आहे. कोयना पायथा वीज गृहातील दोन निर्मिती संच बंद झाला आहे. त्यामुळे 36 मेगावॉट वीजनिर्मिती बंद झाली आहे.
महावितरणने राज्यभर पुकारलेल्या संपाचा सर्वाधिक पाटण तालुक्यातील कोयना विद्युत प्रकल्पाला बसताना दिसत आहे. कारण या ठिकाणी असलेले कोयना पायथा वीज गृहातील दोन संच बंद पडले आहेत. त्यामुळे आता राज्यातील अनेक ठिकाणी बती गुल झाल्याची माहिती समोर येवू लागली आहे. पाटण तालुक्यासह सातारा शहर व ग्रामीण भागालाही संपाचा फटका बसलेला आहे. अनेक गावातील लाईट गेली आहे. तर राज्यातील अनेक भागांना या विद्युत प्रकल्प बंद पडल्याचा फटका सहन करावा लागणार आहे.
कोयना विद्युत प्रकल्पातील कर्मचारीही संपावर गेल्याने कामावर तुटवडा जाणवू लागला आहे. कोयना पायथा गृहात 50 तर पोफळी विद्युत गृहात 450 कर्मचारी संपावर गेले आहेत. पोफळी येथे 1900 मेगावॅट वीज निर्मिती होत असते. तेथे सध्या विद्युत संच सुरू आहेत. पोफळी येथे सध्या रिटायर कर्मचाऱ्यांना बोलविण्यात आले आहे. परंतु उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज दुपारी होणाऱ्या बैठकीत संपावर पुढील निर्णय ठरणार असल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.