मुंबई । लॉकडाऊनच्या काळात वाधवान कुटुंबीयांना खंडाळा ते महाबळेश्वर प्रवास करण्यासाठी शिफारस पत्र दिल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले प्रधान सचिव अमिताभ गुप्ता पुन्हा आपल्या पदावर रुजू झाले आहेत. वाधवान प्रकरण चौकशी समितीने अमिताभ गुप्ता यांना क्लीन चिट दिल्याने ते पुन्हा शेवट रुजू झाले आहेत. मात्र, अमिताभ गुप्ता यांना क्लीन चिट देण्याच्या सरकारच्या निर्णयावर भाजपनं टीकास्त्र सोडलं आहे. वाधवान बंधूंना मुभा देण्यामागे सरकारमधील बड्या नेत्यांचाच हात असून या संपूर्ण प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी व्हायला हवी,’ अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्ष नेते फडणवीस यांनी केली आहे.
‘एखादा अधिकारी अशा प्रकारे स्वत:च्या अधिकारात इतका मोठा निर्णय घेऊ शकत नाही. कोणाच्या तरी इशाऱ्यावरून किंवा आदेशानंच त्यांनी हा निर्णय घेतला असावा, हे आमचं म्हणणं आता खरं ठरल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे. ‘ज्या वेगानं गुप्ता यांना क्लिन चिट देण्यात आली, त्यावरून सरकार चालवणाऱ्यांच्या आशीर्वादानंच वाधवान बंधूंना पास दिला गेला होता हे स्पष्ट झालंय. हे आघाडी सरकार आहे की वाधवान सरकार असा प्रश्न आम्हाला पडलाय. त्यामुळंच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सीबीआयकडून व्हायला हवी, अशी मागणी फडणवीस यांनी केली.
काय आहे वाधवान प्रकरण?
कोरोनामुळे महाराष्ट्रात लॉकडाऊन असताना व कुणालाही बाहेर पडण्याची मुभा नसताना वाधवान बंधूंना सहकुटुंब खंडाळा ते महाबळेश्वर प्रवासाची मुभा एका शिफारस पत्राद्वारे देण्यात आली होती. ‘माझे फॅमिली फ्रेंड’ असा उल्लेख करत गृहसचिव अमिताभ गुप्ता यांनी वाधवान यांच्या ५ गाड्यांसाठी विशेष शिफारस पत्र दिलं होत. या सर्वांना कौंटुबिक अत्यावश्यक कारणासाठी महाबळेश्वरला जायचं आहे, असंही त्यावर नमूद करण्यात आलं होतं. मात्र, ही बाब उजेडात आल्यावर राज्यात विरोधकांनी यावरुन महाविकास आघाडी सरकारला चांगलेच धारेवर धरले होते. अखेर राज्य सरकारने अमिताभ गुप्ता यांना १० एप्रिलला सक्तीच्या रजेवर पाठवले होते. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासनही राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले होते. दरम्यान चौकशी समितीने अमिताभ गुप्ता यांना निर्दोष ठरवले. त्यामुळे त्यांना पुन्हा प्रधान सचिव पदावर रुजू करुन घेण्यात आल्याचे समजते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”