हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काही दिवसांपूर्वी उत्तराखंड पर्यटन विभागाची वेबसाइट हॅक केल्याचं प्रकरण समोर आलं होतं. मुस्लिमांवर हल्ले केले तर आम्ही गप्प बसणार नाही, असा संदेश ही वेबसाइट उघडल्यावर दिसत होता. भारतातील आणखी वेबसाइट हॅक करू, असाही इशारा दिला होता.त्यानंतर आज महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाची वेबसाइट हॅक केल्याचं उघड झालं आहे. एका इंग्रजी वृत्तवाहिनीनं याबाबत वृत्त दिल आहे.
यावेळीही हॅकर्सनं दिल्लीतील हिंसाचारा दरम्यान मुस्लिमांवर हल्ले होत असल्याचा दावा करतानाच, मोदी सरकार आणि पोलीस विभागाला इशारा दिला आहे. गुगल सर्च इंजिनवर mahacid.gov.in टाकल्यानंतर हॅकर्सचा संदेश दिसतो. कालपासून वेबसाइट हॅक असल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणाची सीआयडी आणि सायबर सेलकडून चौकशी केली जात आहे. ही वेबसाइट हॅक करणारे कोण आहेत हे अद्याप समजू शकले नाही. मात्र, लवकरच हे स्पष्ट होईल, असं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, सीआयडीची वेबसाइट सध्या सुरळीत सुरू असल्याचं दिसतं.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.