परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी यावर्षी ‘महाराष्ट्र दिन’ कार्यक्रम अत्यंत साधेपणाने आयोजित करण्यात आला होता, तसे आदेश मागील आठवड्यात देण्यात आल्याने परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते जिल्हात फक्त एकाच ठिकाणी मुख्य ध्वजारोहण करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६० वा वर्धापन दिनानिमित्य, शुक्रवार दि. १ मे रोजी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे सकाळी 8 वाजता आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज्याचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे मंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. नवाब मलिक यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण संपन्न झाले.
यावेळी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी., पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी, तहसीलदार विद्याचरण कडवकर उपस्थित होते.