मुंबई । पतंजलीने बाजारात आणलेल्या ‘कोरोनील’ नावाच्या औषधाने कोरोना बरा होत नाही. पतंजलीने या औषधामुळे कोरोना बरा होतो असा जनतेत संभ्रम निर्माण केल्यास अथवा जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्यास गृह विभागाच्या मदतीने औषधे व जादूटोणादी उपाय (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा 1954 नुसार कारवाई केली जाईल, असा इशारा राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिला आहे.
काही दिवसांपूर्वी योगगुरू बाबा रामदेव यांच्या पंतजलीनं ‘करोनिल’ हे औषध लाँच केले होते. त्यानंतर या औषधाच्या जाहिरातीवरून आणि विक्रीवरून मोठं वादंग निर्माण झाले होते. तसंच आयुष मंत्रालयानेही पतंजलीला या औषधाची जाहिरात आणि विक्री थांबवण्यास सांगून चाचणीचा अहवालही सादर करण्यास सांगितला होता. त्यानंतर आयुष मंत्रालयानं प्रतिकारशक्तिवर्धक म्हणून परवानगी दिली होती. त्यानंतर आता अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे जनतेत संभ्रम निर्माण केल्यास पतंजलीवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
या औषधामुळे कोरोना बरा होतो असा संभ्रम जनतेमध्ये निर्माण करुन त्यांची दिशाभूल होत आहे. प्रत्यक्षात पतंजली ने तयार केलेले औषध कोरोनील हे अश्वगंधा ,तुळस व गुळवेल वापरून तयार केलेली गोळी (tablet) असून तिचा उपयोग रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी होतो. आयुष मंत्रालयाने सुद्धा रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी वरील औषधाची अश्वगंधा, तुळस, गुळवेल हे घटक समाविष्ट असल्याने शिफारस केली आहे. प्रत्यक्षात यामुळे कोरोना बरा होत नाही. (‘कोरोनाची साथ नैसर्गिकरित्याच संपेल, अनेकांना लसीची गरजही लागणार नाही’)
कोरोनील हे औषधासाठी दिलेले नाव(कोरोना+निल) व प्रसार माध्यमातून होत असलेल्या जाहिराती मुळे जनतेची दिशाभूल व संभ्रम निर्माण होत आहे. कोरोनीलचा वापर फक्त रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे औषध म्हणून केला जाऊ शकतो. या औषधामुळे कोरोना बरा होत नाही याची नोंद जनतेने घ्यावी, असे आवाहन डॉ. शिंगणे यांनी केले
दरम्यान, कोरोनावरील उपचारांसाठी औषध म्हणून योगगुरू रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदने नुकत्याच तयार केलेल्या ‘कोरोनिल’च्या विक्रीवर आयुष मंत्रालयाने कुठलेही निर्बंध घातले नसल्याचे कंपनीने बुधवारी सांगितले. मात्र, या रोगाच्या ‘नियंत्रणासाठी’ हे औषध असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. दरम्यान, पतंजली ‘कोरोनिल’ हे औषध विकू शकते; मात्र ते कोविड-१९ वरील उपचार म्हणून नाही, असे आयुष मंत्रालयाने यापूर्वीच स्पष्ट केले होते. मंत्रालयाने या विशिष्ट सूत्रीकरणाला प्रतिकारशक्तिवर्धक म्हणून परवानगी दिली आहे, करोनाचे औषध म्हणून नाही, असे शिंगणे यांनी स्पष्ट केले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”