हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन – गड किल्ल्यांवर दारू पिऊन गोंधळ घालत असल्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. या घटनांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. गड किल्ल्यांवर गोंधळ घातल्यास 6 महिन्यांचा सश्रम कारावास आणि 10 हजार रुपयांचा दंड होणार आहे. संबंधित व्यक्तीने दुसऱ्यांदा अशाच प्रकारची गैरवर्तवणूक केल्यास त्याला 1 वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात येणार आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयाचं गडप्रेमींनी स्वागत केलं आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात गड किल्ल्यांना खूप महत्वाचे स्थान आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास समजून घेण्यासाठी पर्यटक, अभ्यासक आवर्जून गडांना भेटी देतात. तसेच अलीकडे महाराष्ट्रातील तरुणाई ट्रेकिंगसाठी गडावर जाते. परंतु मधल्या काही काळात काही तरुण गडावर दारू पिऊन धिंगाणा घालत असल्याचे समोर आले. त्यांचे काही व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले. गडांचे पावित्र्य भंग होईल असे प्रकार वाढले आहेत. महाराष्ट्रातील गड किल्ले हे महाराष्ट्राचे वैभव आहे. त्यांची विटंबना होणे योग्य नाही. अशा घटनांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.