राज्यपाल निर्देशित आमदारांच्या यादीवर राज्यपालांचा ढिम्म प्रतिसाद; महाआघाडी सरकार ‘वेट अँड वॉच’ मोडवर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । विधान परिषदेवरील राज्यपाल निर्देशित आमदारांच्या नियुक्त्यांना अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. महाविकासआघाडीतील (Maha Vikas Aaghadi Government) तिन्ही पक्षांकडून 12 आमदारांची यादी तयार आहे. ही यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्याकडे पाठवण्यात आली आहे. मात्र, राज्यपालांकडून ढिम्म प्रतिसाद मिळाला आहे. अद्याप यावर शिक्कामोर्तब झालेलं नाही. विशेष म्हणजे महाविकासआघाडी सरकारकडून याबाबत दोन वेळा विचारणा करण्यात आली आहे. मात्र अद्याप यावर राज्यपालांनी काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यपाल नियुक्त आमदारांबाबत (Governor elected Vidhan Parishad MLC Candidate List) महाविकासआघाडी सरकारकडून राज्यपालांना दोन वेळा विचारणा करण्यात आली आहे. ही यादी राज्यपालांना सुपूर्द करुन काही महिने उलटले आहेत. मात्र तरीही राज्यपालांनी या 12 आमदारांच्या यादीवर सही केलेली नाही. त्यामुळे या यादीवर नेमका कधी शिक्कामोर्तब होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांकडून राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची यादी तयार आहे. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर ही यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींकडे सुपूर्द करण्यात आली आहे. मात्र अद्याप यावर राज्यपालांनी काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान जून महिन्यापासून या जागा रिक्त असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियुक्त्या लांबल्या होत्या.

राज्यपाल नियुक्त आमदारांसाठीचे निकष काय?
कला, वाङ्मय, विज्ञान, सहकारी चळवळ आणि सामाजिक कार्य अशा क्षेत्रातील तज्ज्ञ किंवा प्रत्यक्ष कामाचा अनुभव असलेल्या व्यक्तींची राज्यपाल विधान परिषदेवर नियुक्ती करु शकतात. तज्ज्ञांच्या अनुभवाचा राज्याला फायदा व्हावा, यासाठी विधान परिषदेसारख्या वरिष्ठ सभागृहात दिग्गजांची नियुक्ती करण्याची घटनेत तरतूद आहे.

महाराष्ट्र विधान परिषदेत 12 सदस्य नियुक्त करण्याचे राज्यपालांना अधिकार आहेत. मंत्रिमंडळाकडून शिफारस करण्यात आलेली नावे राज्यपालांकडून स्वीकारली जातात. मात्र सध्या राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकारचे संबंध पाहता तिन्ही पक्षांनी शिफारस केलेल्या नेत्यांची वर्णी सहजासहजी लागणे दुरापास्त मानले जाते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

 

Leave a Comment