मुंबई । राज्य निवडणूक आयोगाने अखेर ग्रामपंचायत निवडणुकांची घोषणा केली असून नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषद निवडणुकांनंतर आता गावागावातही राजकारण तापणार आहे. विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या पाच जागांसाठी सुरळीतपणे निवडणुका पार पडल्यानंतर निवडणूक आयोगाने आता ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे लांबणीवर पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुका आता जानेवारीत होणार आहेत. ( Maharashtra Gram Panchayat Elections)
राज्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर करण्यात आला. या सर्व ठिकाणी १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान होणार असून २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. तर 18 जानेवारीला मतमोजणी करण्यात येणार आहे. त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे.
दरम्यान, १४ हजारांवर ग्रामपंचायतींमध्ये एकाचवेळी निवडणुका होत असल्याने गावागावांतील राजकारण चांगलंच तापणार आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप यांच्यातील ही दुसरी लढत ठरणार आहे. नुकत्याच झालेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपला जोरदार दणका दिला होता. त्यानंतर आता ग्रामीण महाराष्ट्रात कोण बाजी मारतं, हे या निवडणुकांच्या निकालांतून कळणार आहे. ( Maharashtra Gram Panchayat Elections)
नामनिर्देशनपत्रे 30 डिसेंबरपर्यंत द्यावी लागणार
या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे 23 ते 30 डिसेंबर 2020 या कालावधीत स्वीकारली जातील. शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. त्यांची छाननी 31 डिसेंबर 2020 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे 4 जानेवारी 2021 पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल. मतदान 15 जानेवारी 2021 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी 18 जानेवारी 2021 रोजी होईल. गडचिरोली जिल्ह्यात फक्त मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत असेल, असे त्यांनी सांगितले.
25 सप्टेंबरची मतदार यादी ग्राह्य धरणार
विधानसभा मतदारसंघाची 25 सप्टेंबर 2020 रोजी अस्तित्वात असलेली मतदार यादी या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यानुसार तयार करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या 1 डिसेंबर 2020 रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यावर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी 7 डिसेंबर 2020 पर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार अंतिम मतदार याद्या 14 डिसेंबर 2020 रोजी प्रसिद्ध केल्या जाणार आहेत, अशी माहितीही निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली.
नामनिर्देशनपत्रे 30 डिसेंबरपर्यंत द्यावी लागणार
ठाणे- 158, पालघर- 3, रायगड- 88, रत्नागिरी- 479, सिंधुदुर्ग- 70, नाशिक- 621, धुळे- 218, जळगाव- 783, अहमनगर- 767, नंदुरबार- 87, पुणे- 748, सोलापूर- 658, सातारा- 879, सांगली- 152, कोल्हापूर- 433, औरंगाबाद- 618, बीड- 129, नांदेड- 1015, उस्मानाबाद- 428, परभणी- 566, जालना- 475, लातूर- 408, हिंगोली- 495, अमरावती- 553, अकोला- 225, यवतमाळ- 980, वाशीम- 163, बुलडाणा- 527, नागपूर- 130, वर्धा- 50, चंद्रपूर- 629, भंडारा- 148, गोंदिया- 189 आणि गडचिरोली- 362. एकूण- 14,234.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’