हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या 65 व्या महाराष्ट्र केसरी केसरी स्पर्धेचा मातीतील कुस्तीचा अंतिम सामना काल पुण्यात पार पडला. यावेळी महेंद्र गायकवाड विरुद्ध शिवराज राक्षे यांच्यात अशी अंतिम लढत पार पडली. यावेळी शिवराज राक्षे यांनी महेंद्र गायकवाडला चितपट करून महाराष्ट्र केसरीचा किताब पटकवला.
दरम्यान, महाराष्ट्र केसरी ठरलेल्या शिवराज राक्षे यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चांदीची गदा, रोख पाच लाख रुपये आणि महिंद्रा थार ही गाडी तर, उपविजेत्या महेंद्र गायकवाडला ट्रॅक्टर आणि अडीच लाख रुपये बक्षीस देण्यात आले.
कुस्ती आखाड्यात सुरवातीला मातीतील व मॅट विभागातील उपांत्य फेरीच्या लढती पार पडल्या. यावेळी माती विभागात पुण्याच्या महेंद्र गायकवाडने सोलापूरच्या सिकंदर शेखचा पराभव करत अंतिम सामन्यात प्रवेश केला. तर मॅट विभागात शिवराज राक्षे याने हर्षवर्धन सदगीर याचा पराभव करत अंतिम सामन्यात प्रवेश केला. यानंतर एक तासाच्या विश्रातीनंतर पुन्हा माती विभागातील महाराष्ट्र केसरी किताबासाठी महेंद्र गायकवाड विरुद्ध शिवराज राक्षे यांच्यात अशी अंतिम लढत पार पडली. यावेळी राक्षेने गायकवाडला चितपट केले.
पुण्यातील स्व. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत 65 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष तथा खासदार बृजभूषण सिंह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी खासदार अशोकराव अण्णा मोहोळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी खासदार बृजभूषण सिंह व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही मल्लांचे स्वागत करत कुस्ती लावली. यावेळी ठीक सहा वाजण्याच्या सुमारास सोलापूरच्या सिकंदर शेख आणि पुण्याच्या महेंद्र गायकवाड यांच्यात महाराष्ट्र केसरीच्या उपांत्य फेरीतील कुस्तीला सुरुवात झाली. माती विभागातअटीतटीच्या लढतीत सिकंदरने सुरुवातीला महेंद्रवर डाव टाकला. मात्र, महेंद्रने अतिशय चाणाक्षपणे त्याचा डाव उधळून लावला. यावेळी पुन्हा महेंद्रने डाव टाकत सिकंदरला सामन्यात पराभूत केले आणि अंतिम सामन्यात प्रवेश केला.
माती विभागाच्या मल्लांची कुस्ती संपल्यानंतर मॅट विभागाचे शिवराज राक्षे आणि हर्षवर्धन सदगीर यांच्यात उपांत्य फेरीची लढत झाली. दोन्ही मल्लांमध्ये अतिशय चुरशीची लढत झाली. अखेर 8-2 च्या फरकाने शिवराज राक्षेने मजल मारली आणि अंतिम सामन्यात प्रवेश केला. त्यानंतर शिवराज राक्षे विरुद्ध महेंद्र गायकवाड यांच्यात महाराष्ट्र केसरी किताबासाठी अंतिम लढत पार पडली.
विजेत्या मल्लांवर बक्षिसांचा वर्षाव
महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद व संस्कृती प्रतिष्ठान आयोजित 65 व्या ‘महाराष्ट्र केसरी’चा थरार आज पार पडला. दरम्यान ‘महाराष्ट्र केसरीचा किताब प्राप्त करणाऱ्या विजेत्याला 14 लाखांची महिंद्रा थार जीप व रोख 5 लाखांचे बक्षीस, तर उपविजेत्याला ट्रॅक्टर व रोख 2.5 लाखांचे बक्षीस प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आले.