स्थानिक प्रतिनिधी, लातूर
लातूर | मराठा क्रांतीच्यावतीने आज मराठा आरक्षण व अन्य १९ मागण्यांसाठी महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार लातूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात अत्यंत कडकडीत बंद ठेवण्यात आला. मात्र, मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने या बंदला गालबोट लागले आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, लातूर ग्रामीणचे आमदार त्रिंबक भिसे यांच्या गाडीवर पिंपळफाटा येथे मराठा आंदोलकांनी तुफान दगडफेक करून त्यांना अक्षरशः पिटाळून लावले आहे. तर लातूर महापालिकेच्या आवारात घुसून पालिका आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांच्या शासकीय गाडीसह अन्य पाच गाड्यांवर आंदोलकांनी दगडफेक करून वाहनांचे नुकसान केले आहे.
दरम्यान शहरात काही ठिकाणी रास्ता रोको करण्यात आले. दुपारपर्यंत शहर व जिल्हाभरात विविध ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात टायर जळत असल्याचे चित्र पाहायला मिळत होते.