नाशिक प्रतिनिधी |कांद्याला मिळणाऱ्या अल्प दराचा निषेद म्हणून नाशिक येथील शेतकरी संजय साठे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मनी ऑर्डर केली होती. ती मनी ऑर्डर त्यांनी कांद्याच्या विक्रीतून आलेल्या सर्व पैशाची केली होती. त्यामुळे त्यावेळी ते माध्यमांच्या प्रकाश झोतात आले होते.
२२ एप्रिल रोजी नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव येथे नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा पार पडणार आहे. त्या सभेच्या दरम्यान आपली नरेंद्र मोदी यांच्या सोबत भेट घालून द्यावी अशी मागणी करणारा इमेल संजय साठे यांनी जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे. त्यामुळे मोदींशी या शेतकऱ्याची भेट होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
संजय साठे यांची मनी ऑर्डर आणि पत्र मिळताच नरेंद्र मोदी मोदी यांनी कांद्याच्या प्रश्नाबाबत प्रशासनाला चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर संजय साठे यांच्याशी स्थानिक जिल्हाधिकाऱ्यानी संवाद साधला होता. मात्र त्यानंतर कांद्याच्या दरात कोणतीच सुधारणा झाली नाही. त्यामुळे संजय साठे यांनी नरेंद्र मोदी यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली असावी.