नागपूर । संपूर्ण राज्य कोरोनाशी लढण्यात व्यस्त असताना राज्याने एक महत्वाची केंद्रीय संशोधन संस्था गमावली आहे. नागपुरात असलेली राष्ट्रीय खनिकर्म आरोग्य संस्था आणि तिची प्रयोगशाळा आता अहमदाबाद मधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑक्युपेशनल हेल्थमध्ये विलीन करण्यात आली आहे. दुर्दैव म्हणजे महाराष्ट्राच्या कोणत्याही लोकप्रतिनिधीने यासंदर्भात दमदारपणे आवाज उठवलेला नाही. त्यामुळे लाखो खाण कामगारांच्या आरोग्याशी निगडित महत्वाचा संशोधन करणाऱ्या राष्ट्रीय खणिकर्म आरोग्य संस्थेने नुकतच नागपुरातील त्यांच्या कार्यालयाचा कारभार गुंडाळत अहमदाबादची वाट धरली आहे. ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीने याबाबतचे वृत्त दिले आहे.
2002 मध्ये राष्ट्रीय खणिकर्म आरोग्य संस्था नागपूरात स्थलांतरित
विदर्भ देशातील खाणकाम उद्योगाचा महत्वाचा केंद्र असल्यानेच तत्कालीन सरकारने 2002 मध्ये राष्ट्रीय खणिकर्म आरोग्य संस्था नागपूरात असणे आवश्यक असल्याचे ओळखले होते. कर्नाटकातील कोलार मधून राष्ट्रीय खणिकर्म आरोग्य संस्था नागपूरात स्थलांतरित केली होती. एवढेच नाही तर खाणकाम क्षेत्रात काम करणाऱ्या लाखो मजुरांच्या आरोग्याच्या प्रश्नांवर संशोधन करून त्याबद्दल उपाय शोधण्यासाठी नागपूरात एक अद्ययावत प्रयोगशाळा ही उभारली गेली होती. या प्रयोगशाळेच्या माध्यमातून खाणीमध्ये काम करणारे कामगार आणि खाणीलगत निवास करणारे नागरिक यांच्या आरोग्यावर तिथल्या ध्वनी, वायू, जल प्रदूषणाचे तसेच हवेतील धूलिकण आणि जमिनीतील कंपनाचे काय परिणाम होतात हे तपासण्याचे काम गेली अनेक वर्षे ही प्रयोगशाळा करत होती. त्यामुळे खाणी मध्ये काम करणारे आणि खाणीलगत राहणाऱ्या लाखो लोकांच्या आरोग्यासंदर्भात दर्जेदार संशोधन होऊन त्यावरील उपाय शोधले जात होते.
2019 मध्येचं संस्थेला गुजरातमध्ये हलवण्याचा प्रस्ताव केंद्रानं गुपचूप पारित केला
2019 मध्ये अचानक केंद्र सरकारने राष्ट्रीय खनिकर्म आरोग्य संस्थेला तिच्या प्रयोगशाळेसह अहमदाबाद येथील नेशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑक्यूपेशनल हेल्थ या संस्थेत विलीन करण्याचे ठरविले. त्यांसदर्भात जुलै 2019 मध्येच केंद्रीय कैबिनेटमध्ये प्रस्ताव ही पारित करण्यात आला. मात्र, त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. आता जेव्हा संपूर्ण देश कोरोना संदर्भातील लॉकडाऊनमध्ये अडकला. तेव्हा हळुवारपणे नागपुरातील वाडी परिसरातून या महत्वपूर्ण संशोधन संस्थेचा कार्यालय आणि अद्ययावत प्रयोगशाळा गुंडाळण्याचे काम सुरु झाले. प्रामुख्याने विदर्भात आणि मध्य भारतात असलेल्या खाण कामगारांच्या आरोग्य विषयक समस्या जाणून घेत त्याबद्दलचे संशोधन अहमदाबाद किंवा बंगळुरूमध्ये बसून कसे करता येणार असा प्रश्न आता विचारला जात आहे.
महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींना उशिरा आली जाग
महाराष्ट्रातून ही संस्था गुंडाळण्याची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींना जाग येत आहे. खाण कामगारांचा जिल्हा आणि खाणीच्या उद्योगामुळे जिथल्या नागरिकांना अनेक समस्या भोगाव्या लागतात अशा चंद्रपूर जिल्ह्याचे खासदार बाळू धानोरकर यांनी राष्ट्रीय खनिकर्म आरोग्य संस्था महाराष्ट्रातून बाहेर नेणे हे महाराष्ट्रावर अन्याय असल्याचे म्हटले आहे. 2019 मध्ये यासंदर्भात संसदेत आवाज उठवला होता. आता ही महाराष्ट्राच्या या संस्थेला परत मिळवण्यासाठी लढा देणार असल्याचे बाळू धानोरकर म्हणाले.
या पूर्वी ही महाराष्ट्रातील काही संस्था गुजरात आणि इतर राज्यात स्थलांतरित केल्याच्या घटना घडल्या आहेत. प्रत्येक वेळेला महाराष्ट्राच्या अस्मितेच्या नावाखाली काही दिवस आरोप प्रत्यारोपाचे राजकारण करण्यापलीकडे फार काही झाल्याचे दिसून आले नाही. त्यामुळेच एक एक करून महाराष्ट्रातून इथल्या उद्योग आणि कामगारांसाठी महत्वाच्या संस्था इतर राज्यात नेल्या जात असल्याचे पाहायला मिळत आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”