हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होणार आहे. आजपासून सुरु झालेलं हे अधिवेशन ४ ऑगस्ट पर्यतच सुरु राहणार आहे. अजित पवारांचा गट शिंदे- फडणवीसांबरोबर सत्तेत सामील झाल्यानंतर हे पाहिलेच अधिवेशन आहे. त्यामुळे हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे अधिवेशनाला काही तास उरले असतानाही अजूनही विरोधी पक्षनेता कोण आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
काल अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेलया चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. हे सरकार घटनाबाह्य सरकार असून याला संविधानाची मान्यता नाही असा आरोप विरोधकांनी केला तर विरोधकांनी आत्मविश्वास गमावला असून आम्ही त्यांना कामातून उत्तर देऊ असं प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मागील अधिवेशनावेळी अजित पवार हे विरोधी पक्षनेते होते, परंतु आता तेच सत्तेत सामील झाल्यामुळे अनेक पेच निर्माण झालेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आसनव्यवस्थेपासून ते कोणाचा व्हीप महत्त्वाचा ठरणार असे अनेक पेच निर्माण झाले आहेत. त्यामुळे अधिवेशन सुरु झाल्यानंतरच अनेक बाबी स्पष्ट होतील.
कोणकोणती विधेयके मांडली जाणार?
यंदाच्या पावसाळी अधिवेशनात शिंदे- फडणवीस आणि अजित पवार सरकार कडून २४ विधेयके व ६ अध्यादेश मांडले जाणार आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील उद्योग, राज्यातील एसआरए प्रकल्पांसंदर्भातील महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा विधेयक, महानगरपालिका विधेयक, मुंबई महानगरपालिका विधेयक, व्यापार व गुंतवणूक सुविधा विधेयक यांसारख्या महत्त्वपूर्ण विधेयकांनाच समावेश आहे. तसेच महाराष्ट्र कॅसिनो विधेयकावर सुद्धा चर्चा होणार आहे. परंतु सध्याची एकूण राजकीय परिस्थिती पाहता विधानसभेचे पावसाळी अधिवेशन वादळी होण्याची शक्यता आहे.