Tuesday, January 7, 2025

राज्यात आजपासून पोलीस भरतीला सुरुवात; 14 हजार जागांसाठी 18 लाख ऑनलाईन अर्ज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेक वर्ष रखडलेल्या पोलीस भरती प्रक्रियेला अखेर सुरुवात झालेली आहे. आजपासून पोलीस भरती प्रक्रियेतील शारीरिक क्षमता चाचणीला जिल्ह्या-जिल्ह्यांमध्ये सुरुवात झालेली आहे. यंदा पहिल्यांदाच शंभर टक्के तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. भरती प्रक्रिया अचूक आणि पारदर्शीपणे व्हावी यासाठी हे तंत्रज्ञान वापरलं जात आहे.

राज्य सरकारकडून पोलीस भरतीसाठी तब्बल 14 हजार जागांसाठी भरती केली जात आहे. राज्यभरातील तरुण तरुणी या भरतीसाठी अभ्यास आणि सराव करत आहेत. 9 नोव्हेंबर पासून सुरु करण्यात आलेली ही नोंदणी प्रक्रिया 15 डिसेंबरपर्यंत चालू होती. यामध्ये सुमारे 18 लाख पेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज केले आहेत.

कोणकोणत्या तारखेला शारीरिक चाचणी?

2 ते 4 जानेवारीपर्यंत चालक पदासाठी पुरुष उमेदवारांची शारीरिक चाचणी तर 5 जानेवारीला महिला उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी होणार आहे. 6 ते 14 जानेवारी 2023 पर्यंत पोलीस शिपाई पदासाठी पुरुष उमेदवारांची शारीरिक चाचणी होणार आहे. तर 15 ते 17 जानेवारीपर्यंत पोलीस शिपाई पदासाठी महिला उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी होणार आहे. रविवारचा दिवस वगळून ही चाचणी होणार असल्याचे पोलीस विभागाकडून सांगण्यात आले आहे.

14 हजार जागांसाठी 18 लाख ऑनलाईन अर्ज

महाराष्ट्र पोलीस दलातील सुमारे 14 हजार पोलीस शिपाई जागांसाठी पोलीस भरतीच्या प्रक्रियेला 9 नोव्हेंबरपासून सुरुवात झाली. त्यासाठी मागवण्यात आलेल्या ऑनलाईन अर्जांसाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत होती. परंतु सर्व्हरच्या तांत्रिक अडचणींमुळे 15 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर राज्यभरातून सुमारे 14 हजार जागांसाठी 18 लाख ऑनलाईन अर्ज आलेले आहेत. त्यानुसार, आजपासून पोलीस भरतीच्या शारीरिक आणि मैदानी चाचणीला सुरुवात होत आहे.

मैदानी चाचणीसाठी ‘ही’ कागदपत्रे आवश्यक

– उमेदवारांच्या ओळखपत्राच्या दोन प्रती
– आवेदन अर्जाच्या दोन छायांकित प्रती,
– सर्व मूळ कागदपत्रे
– सर्व कागदपत्रांचा छायांकित प्रतींचा संच
– अर्जावर सादर केलेला फोटो (सहा फोटो)
– आरक्षण, क्रीडा प्रमाणपत्र, चारित्र्य पडताळणी अहवाल, आधारकार्ड, पॅनकार्ड, एलएमव्ही आरक्षण लायसन्स, प्रवेश पत्र

अशी असणार शारीरिक चाचणी

पोलीस शिपाई पदासाठी शारीरिक चाचणी एकूण 50 गुणांची होणार आहे. यामध्ये पुरुष उमेदवारासाठी 1600 मीटर धावणे (20 गुण), 100 मीटर धावणे (15 गुण), गोळाफेक (15 गुण) असे एकूण 50 गुण तर महिला उमेदवार 800 मीटर धावणे (20 गुण). 100 मीटर धावणे (15 गुण), गोळाफेक (15 गुण) असे एकूण 50 गुण असणार आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई (पुरूष) पदासाठीशारीरिक चाचणी एकूण 100 गुणांची होणार आहे. यामध्ये पुरुष उमेदवारासाठी 5 कि.मी. धावणे (50 गुण), 100 मीटर धावणे (25गुण), गोळाफेक (25 गुण) असे एकूण 100 गुण असणार आहेत. शारीरिक चाचणीमध्ये किमान 50 टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या 1:10 या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी पात्र असतील.