एसटीच्या १ लाख दहा हजार कर्मचाऱ्यांचे वेतन रखडणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एसटीच्या १ लाख दहा हजार कर्मचाऱ्यांचे वेतन रखडणार असल्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे. पुढील सूचना प्राप्त होईपर्यत वेतन न करण्याचे सरकारी आदेश असल्याची माहिती मिळत आहे. वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत सरकारने आदेश दिले आहेत. एसटीच्या कर्मचाऱ्यांमध्ये या निर्णयामुळं कमालीची नाराजी आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर व्हावे म्हणून एसटीच्या वरिष्ठ अधिकारी कार्यालयाकडून एसटी प्रशासनाला आदेश देण्यात आले होते. मात्र, ३१ मार्च रोजी एसटीच्या वित्त आणि लेखाअधिकारी यांनी राज्यातील एसटीच्या अधिकाऱ्यांना एक ई-मेल पाठवला आहे. या ई-मेलमध्ये राज्यातील सर्व आर्थिक परिस्थिती पाहता पुढील सूचना प्राप्त होईपर्यत एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन न करण्याचे नमूद केलं आहे. दरम्यान, या ई-मेलमध्ये कर्मचाऱ्यांचे वेतन न करण्याचे म्हणतं असताना राज्य परिवहन कर्मचारी असा शब्दप्रयोग केला आहे. वास्तविक राज्य परिवहन महामंडळ असा शब्द प्रयोग असायला हवा होता असं एसटी कर्मचाऱ्यांचे म्हणणं आहे. त्यामुळं राज्य सरकारने दिलेला आदेश एसटी कर्मचाऱ्यांना लागू होतो कि, नाही याबाबत संभ्रम आहे.

दरम्यान, काल करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यासमोरील आव्हाने लक्षात घेऊन लोकप्रतिनिधी तसेच शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे वेतन दोन टप्प्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला असून लोकप्रतिनिधी आणि शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यांचे संपूर्ण देय वेतन दोन टप्प्यात मिळेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”