अहमदनगर । देवेंद्र फडणवीस यांना बिहार निवडणुकीची जबाबदारी देण्याचा निर्णय म्हणजे सुशांतसिंह प्रकरणातील राजकारणाचा पुरावाच आहे, असं मत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केलंय. ‘ज्यांनी ५ वर्षे स्वतः गृहखाते सांभाळले तेच आता मुंबई पोलिसांवर संशय व्यक्त करतात, हे दुर्दैवी आहे. ते सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचं राजकारण करतात,’ असा घणाघात हसन मुश्रीफ यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला. आज नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात मुश्रीफ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना मुश्रीफ यांनी सुशांतसिंह प्रकरणावरून फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलं.
देवेंद्र फडणवीस यांची बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे प्रभारी म्हणून नियुक्ती केले जाणार आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. याबाबत बोलताना मुश्रीफ म्हणाले की, ‘सुशांत सिंह राजपूत या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली होती आणि आता त्यांना प्रभारीपद दिले जात आहे, हे सर्व पाहता या प्रकरणात राजकारणच आहे, अशी प्रतिक्रिया आमच्या सर्व नेते मंडळींनी दिली आहे. माझेही तेच मत आहे. ५ वर्षे ज्यांनी स्वतः गृहखाते सांभाळले तेच पोलिसांवर संशय व्यक्त करतात ही दुर्दैवी गोष्ट आहे,’ असा टोलाही त्यांनी लगावला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”