हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना रुग्णसंख्येत घट झाल्यानंतर राज्य सरकारनं पाच टप्प्यांमध्ये राज्यातील निर्बंध शिथिल केले होते. मात्र निर्बंधांमध्ये शिथिलता आल्यानंतर काही दिवसातच कोरोनाबाधित आणि मृतांच्या आकड्यांमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचं समोर येत आहे. सोबतच राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचा धोका देखील वाढू लागला आहे या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा नवीन नियमावली जाहीर करण्यात आली असून आता राज्यातील सर्वच जिल्ह्यांचा समावेश तिसऱ्या टप्प्यात केला आहे
आज राज्य सरकारने जाहीर केलेल्या निर्णयानुसार आता पॉझिटिव्हिटी रेट किंवा बेड ऑक्युपन्सीचं प्रमाण कितीही कमी असलं, तरी राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगर पालिका पुढील आदेश येईपर्यंत या तिसऱ्या गटाच्या वरच असणार आहेत. आता निर्बंध कमी करायचे असल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून २ आठवड्यांच्या आकडेवारीचा आढावा घेतला जाईल. त्यानुसार निर्णय घेतले जातील. मात्र, निर्बंध वाढवायचे असल्यास दोन आठवड्यांच्या आकडेवारीची वाट पाहण्याची गरज नाही, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.
Levels of restrictions for safe Maharashtra pic.twitter.com/FOAKTSrI9A
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 25, 2021
नवीन नियमावली नुसार तिसऱ्या स्तरावरील निर्बंधात रेस्टॉरंट, हॉटेल्स यांना ५० टक्के क्षमतेने संध्याकाळी ४ वाजेपर्यंत खुली ठेवण्याची परवानगी आहे. विकेंड दिवशी हॉटेल सुरू राहणार नाहीत. त्यावेळी होम डिलिव्हरी करण्यास परवानगी असेल. त्याचसोबत आरोग्य कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल ट्रेनने प्रवास करता येईल. जीम, सलून आणि स्पा दुकानं ५० टक्के क्षमतेने संध्याकाळी ४ वाजेपर्यंत खुली ठेवता येतील.