हो, फडणवीस पुन्हा येणार..!! महायुतीला मिळणार १८५ ते १९५ जागा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र ।

दीर्घकाळ प्रतीक्षेत असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी सोमवारी मतदानप्रक्रिया पार पडली. २०१४ च्या विधानसभा निवडणुकांपेक्षा मतदानाची टक्केवारी खालावली असून ठाण्यात मतदानाच्या टक्केवारीचा निच्चांक पहायला मिळाला. विरोधकांचं निष्प्रभ असणं, ऐनवेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी केलेलं पक्षांतर, कलम ३७० चा निवडणूक प्रचारासाठी केलेला वापर, कार्यक्षम मुख्यमंत्री अशी प्रतिमा ठसवण्यात देवेंद्र फडणवीसांना आलेलं यश या सर्वांचा प्रभाव २०१९ च्या विधानसभा निवडणुकांवर पडलेला दिसत असून राज्यात पुन्हा फडणवीस सरकार येणार हे निश्चित मानण्यात येत आहे. यामध्ये गतनिवडणुकीत मिळालेल्या जागा जैसे थे परिस्थितीत राहणार असून काही जागांची अदलाबदल होण्याची शक्यता आहे.

शिवसेना १२४ जागांपैकी ६० ते ६५ जागांवर यशस्वी होईल तर मित्रपक्षांसहित भाजप १२५-१३० जागांवर यशस्वी होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस ५५ ते ६० जागा मिळवण्यात यशस्वी होईल. काँग्रेसच्या जागांत मात्र गतवेळेपेक्षा ५ ते १० ने फरक पडण्याची शक्यता आहे. काँग्रेस ३० ते ३५ जागा मिळवण्यात यशस्वी होईल. शेकाप, शेतकरी संघटना आणि इतर अपक्ष मिळून ८ ते १० जागा मिळवतील असा अंदाज आज झालेल्या मतदानातून वर्तवण्यात येईल.

विधानसभेसोबत साताऱ्याच्या लोकसभा पोटनिवडणुकीचा निकालही वर्तवण्यात येत असून राष्ट्रवादी पक्षातून ३ वेळा खासदार म्हणून निवडून गेलेल्या उदयनराजे भोसले यांचा १ लाखापेक्षा जास्त मतांनी पराभव होणार असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. दरम्यान मतदानावेळी अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रात बिघाड झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. अमरावती, अहमदनगर, औरंगाबाद आणि सोलापूरमधील काही किरकोळ अपवाद वगळता सर्वत्र शांततेत मतदान पार पडलं. गडचिरोलीतही मतदानाची टक्केवारी राज्यातील इतर भागांच्या तुलनेत चांगली असल्याचं पहायला मिळालं.

Leave a Comment