टीम, HELLO महाराष्ट्र । आज पाहूया हाय प्रोटीन, हाय फायबर काबुली चण्यांची एक चटपटीत रेसिपी
साहित्य :
अर्धा कप काबुली चणे, २ मध्यम आकाराचे कांदे, २ मध्यम आकाराचे टोमॅटो, १ इंच आल्याचा तुकडा, पाव कप लसूण पाकळ्या, ३-४ हिरव्या मिरच्या, अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर, २ टीस्पून जिरं, २ तमालपत्र, १ मसाला वेलची, १०-१२ मेथी दाणे, १ बाद्यान (चक्रीफूल), २ लवंगा, १ इंच दालचिनीचा तुकडा, ८-१० काळी मिरी, १ टीस्पुन हळद, दीड टीस्पून लाल मिरचीची पूड, १ टीस्पुन धणे पूड, पाव कप चिंच, २ टीस्पून सैंधव, जाडे मीठ चवीनुसार, पाव कप तेल
कृती :
काबुली चणे सकाळी भिजत घालावेत आणि रात्री उपसून चाळणीत झाकून ठेवावेत. म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी उसळ करता येते.
कांद्याची सालं काढून अख्खा कांदा विस्तवावर भाजायला ठेवावा. कांदे भाजून झाले की टोमॅटो विस्तवावर भाजून घ्यावेत. कांद्याची व टोमॅटोची बाहेरची बाजू बरीचशी काळी झाली की विस्तवावरून काढून घ्यावेत.
आता भाजलेले अख्खे कांदे, अख्खे टोमॅटो, आलं, लसूण, हिरवी मिरची हे सगळं एकत्र बारीक वाटून घ्या.
कढईत तेल गरम झालं की सगळा खडा मसाला घाला. त्यात आधी वाटलेलं टोमॅटो कांद्याचं वाटण घाला आणि चांगलं परतून घ्या. त्यात हळद, लाल मिरची पूड, धणे पूड घालून पुन्हा परतून घ्या.
काबुली चणे धुवून या मसाल्यात घाला. मसाला चण्यांना सगळीकडे लागेल अशा पद्धतीने हलवून आता त्यावर झाकण ठेवा. एक वाफ येऊ द्या. एकीकडे २ ग्लास पाणी गरम करायला ठेवा.
एक वाफ आली कि झाकण काढून गरम पाणी घाला. पुन्हा झाकण ठेवून थोडा वेळ उकळू द्या.
आता त्यात चिंच, सैंधव आणि मीठ घाला व पुन्हा झाकण ठेवा. आता थोडा वेळ मध्यम आचेवर चणे शिजू द्या. (चणे कुकर मध्ये शिजवून घेण्याची आवश्यकता नाही.)
साधारण ८-१० मिनिटांत चणे शिजतात. आता गॅस बंद करून कोथिंबीर घाला आणि परत पाच मिनिटं झाकण ठेवा.
काबुली चण्याची ही उसळ कोणत्याही भाकरी सोबत आणि भातावरही छान लागते.