गांधी जयंती विशेष | आकाश सुलोचना
शेंबड्या मुलापासून ते विचारी समजल्या जाणाऱ्या गृहस्थापर्यंत, सर्वांनी गांधीला यथेच्छ शिव्या हासडताना मी पाहिले आहे. मी दलित समाजात साचलेला गांधी बद्दलचा द्वेष पाहीला आहे. मी गांधीवरून तरुणांची टिंगलटवाळकी पाहिली आहे. पण जेव्हा ही सर्व अहंकारी, द्वेषपूर्ण, अतिशयोक्ती पूर्ण व भडक आवरणे काढून मी गांधींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मला असे वाटले कि मी झऱ्याच्या अशा उगम स्थानी येऊन पोहोचलो आहे, ज्याचे पुढे मोठ-मोठे समुद्र बनतात. गांधी झऱ्यासारखाच विचार आहे, जो पुढे सर्वांचा विचार बनून जातो. गांधी झर्याच्या नितळ व पारदर्शक पाण्याप्रमाणे आहे, ज्यात कुणीही कधीही आरपार पाहू शकतो. गांधी झऱ्या प्रमाणे नम्र आहेत. जे शेवट पर्यंत म्हणतात, ‘समाज नेता नाही बदलत. मी नेता नाही. मी तुमच्यासारखाच सर्वसामान्य माणूस आहे. चला आपण सर्व मिळून समाज बदलूयात.’
१५ ऑगस्ट १९४७ ला जेव्हा देश स्वातंत्र्याचा आनंदोत्सव साजरा करत होता, तेव्हा दूर कलकत्त्या जवळील नौखाली या गावात एक म्हातारा हिंदू-मुस्लीम तणाव दूर करण्यासाठी अहोरात्र झटत होता. ती व्यक्ती म्हणजे गांधी. मी गांधीवादी नाही, पण एक माणूस म्हणून हेचित्र पाहून माझे रुदय नक्कीच हेलावले असते. कारण ज्या क्षणा साठी आता पर्यंत स्वांतत्र्याचा लढा त्यांनी दिला होता, तो क्षण जवळ आला असताना, दिल्ली मध्ये हा आनंद अनुभवण्या ऐवजी गांधीना बंगाल मध्ये हिंदू-मुस्लीम दंगल रोखणे गरजेचे वाटत होते. गांधी म्हणतात, ‘भाषण देणे सोपे असते. खरी कसोटी असते त्याची अंमलबजावणी करणे. तुम्ही जात, वर्ण, वर्ग, पितृसत्ता आपल्या आचरणाने तोडू शकता. तुमच्या आचरणानेच तुम्ही समाजाला आदर्श राहण्याची प्रेरणा देऊ शकता.’ गांधीनी आपल्या आचरणातून नेहमी हेच सिद्ध केले. त्यांचे कार्य नेहमी त्यांच्या शब्दांपेक्षा अधिक काही बोलून जात.
गांधींना साचलेपणा मान्य नव्हता. गांधी स्वतःला नेहमी बदलवण्याचा प्रयत्न करत राहिले. स्वतः वर प्रयोग करत राहिले. प्रत्येक क्षणी स्वतःला चांगला माणूस बनवण्याचा प्रयत्न करत राहिले. आपल्या सामाजिक आणि राजकीय भूमिकांवर परत परत विचार करून त्या अधिक प्रगल्भ करत राहिले. पण आपल्या तत्त्वांना आणि मूल्यांना त्यांनी कधी बगल दिली नाही. या बाबतीत ते नेहमीच दृढ राहिले. ते म्हणत, ‘खरं बोला, समाजासोबत व स्वतःसोबत ही पारदर्शक व प्रामाणिक राहा.’ गांधी आपल्या सत्याचे प्रयोग या आत्मचरित्राच्या प्रस्तावनेत भूमिका मांडताना म्हणतात ‘मी जी प्रकरणे लिहिणार आहे, त्यात जर वाचकाला अभिमानाचा भास झाला, तर त्यानेखुशाल समजावे कि माझ्या शोधात काही तरी न्यून आहे, आणि माझा साक्षात्कार मृगजला समान आहे.’
राष्ट्रीय आंदोलनासाठी गांधींनी समाजातील वेगवेगळ्या समूहांना एका मंचावर आणले व इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी प्रेरित केले. राष्ट्रीय भावना विकसित करणे हे सोपे काम नव्हते. युरोपातील राष्ट्रीयत्वाची भावना हि वित्तीय भांडवलाशी जोडलेली होती. तर याउलट साम्राज्यवादा विरोधी राष्ट्रवाद बहुसंख्य लोकांच्या हिताशी जोडलेला होती. युरोपातील बुर्जुआ राष्ट्रवाद, शत्रू आपल्यातीलच अल्पसंख्याक आहेत असे सांगू शकतो. पण सामाज्यावादा विरोधातील राष्ट्रवाद हा सर्वसमावेशक आहे. किंबहुना साम्राज्यवादी शक्तींविरोधात लढण्यासाठी “एकता” व म्हणून सर्वसामावेशकता ही सर्वात पहिली अट आहे. हा फरक आजच्या सरकार प्रसारित संकुचित, भांडवली, धर्मांध राष्ट्रवादी भावनांपासून गांधींना व स्वाधीनता आंदोलनाला वेगळं करते.
समाजातील लोकांना जोडण्यासाठी गांधींना वेगवेगळे अभियान हाती घेतले. गांधींच्या आंदोलनाचे वैशिष्ट्य हे होते त्यांनी समाजातील सर्व स्तरातील लोकांना सामावून घेतले. गांधी म्हणत, ‘आंदोलन असे हवे ज्यात सामान्य माणूस देखील सहज भाग घेऊ शकतो.’ चरख्याचा माध्यमातून सामान्य व्यक्तींना, स्त्रियांना घरबसल्या स्वातंत्र्य आंदोलनाशी जोडता आले, हीच स्वातंत्र्य आंदोलनाची खासियत होती. गांधीजी म्हणत, ‘जर तुम्हाला सर्वसामान्य जनतेसाठी काम करायचे असेल, तर तुम्हालाही सर्वसामान्य बनावे लागेल. त्यांच्यासारखे काम करावे लागेल.’ गांधीनी आपल्या कृतीतून हेच केल्याचे आपणाला दिसून येते.
कोणत्याही व्यक्तीचा राजकीय खून त्या व्यक्तीच्या राजकीय भूमिकेला अधिक ठळक करतो. हिंदुत्ववादी संघटनांना गांधींना मारण्याची गरज का वाटली हे गांधींच्या कार्यावरून आपल्याला लगेच लक्षात येते. त्यावेळी गांधी दिल्ली मध्ये होते. १३ जानेवारी १९४८ ला गांधींनी आपल्या आयुष्यातील शेवटचा उपवास केला. गांधींपासून प्रेरणा घेऊन अनेक हिंदूंनी, मुसलमानांनी शस्त्रे खाली टाकली. अनेक ठिकाणी गांधींना विरोध होत होता, भारतातील प्रमुख नेते त्यांना सुरक्षिततेच्या कारणावरून संवेदनशील जागी न जाण्याचे सांगत पण गांधी तेथे जात व लोकांशी संवाद करत, त्यांना एकता जपण्याचे, एकोप्याने राहण्याचे आव्हान करत. यातून प्रेरणा घेऊन अनेक हिंदुनी मुसलमानांना आणि मुसलमानांनी हिंदुना दंगलीच्या वेळी आपल्या घरात आसरा दिला. फाळणीच्या नंतरही गांधींनी पाकिस्तानला शत्रूराष्ट्र मानले नाही. किंबहुना ते स्वत:ला दोन्ही राष्ट्राचे तितकेच सभासद मानत. त्यांनी कधीच पाकिस्तानाचा, पाकिस्तानी लोकांचा द्वेष केला नाही. त्यांनी पाकिस्तानला फाळणीच्या नंतर देय असणारे ५५ करोड रुपये देण्यासाठी भारत सरकार जवळ आग्रह केला होता. या सर्व बाबी त्यांच्या खून करू इच्छीनाऱ्या विचारधारांना कधीच पटणारया नव्हत्या.
गांधींना जाऊन ७० वर्षे झाली. खरं तर आजचे दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांचे दिवसाढवळ्या खून पाहिले की गांधींच्या खुणाची पुन्हा आठवण येते. जेव्हा विचारवंतांच्या हत्येनेत्यांचा विचार संपवायचा प्रयत्न केला जातो, तेव्हा गांधीचे बोल आठवतात ‘इतिहासात जेव्हा कधीही खुनाच्या बदल्यासाठी खुन असे झाले तेव्हा प्रश्न कधीच सुटले नाहीत, उलट वाढीला लागले आहेत.’ त्यामुळे जेव्हा कधी, ‘लोकशाहीने प्रश्न सुटतील का?’ असा असा विचार येतो, तेव्हा ही वाक्ये मला अधिक मजबूत बनवतात.
आज देशात दिवसागणिक एका दलिताची हत्या होते, पन्नास मिनिटा मागे एका बाईवर बलात्कार होतो. अश्या बातम्या आपल्या समोर येत असतात. त्याच बरोबर दंगलीत हजारो लोकांना मारले जाते. आज काल तर देशभक्तीच्या नावाखाली कुणालाही अटक केली जाते. गायीच्या नावाखाली माणसांचे तुकडे केले जातात. हे सगळे पाहिले कि, माणसांचा राग येऊ लागतो. त्यांच्या हीन संवेदन शून्य वृत्तीची किळस वाटू लागते. तेव्हा गांधींचे शब्द मला योग्य रस्ता दाखवतात. गांधींचे शब्द मला माणसांवरचा विश्वास वाढवायला भाग पाडतात. मानवतेसाठी कार्य करण्याची प्रेरणा देत राहतात. ते म्हणतात, ‘खरा शत्रू माणसाच्या मनात असतो. त्याला संपविले पाहिजे. माणूस वाईट असत नाही. तो तर परमेश्वराची देणगी असतो.’
इतिहासतज्ञ इरफान हबीब यांनी नुकतेच असे भाष्य केले कि, मोदींनी महात्मा गांधीना ‘सॅनेटरी इन्स्पेक्टर’ च्या भूमिकेत बंदिस्त केले आहे. ही बाब आपल्याला नक्कीच विचार करायला लावणारी आहे. त्याचबरोबर भारत सरकारने दिल्लीत आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करून त्यांचे आंदोलन हिसंक रित्या दडपून, आपल्या विचारधारेला साजेसं ठरेल असं अभिवादन महात्मा गांधींना त्यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त केले. या परीक्षा घेणाऱ्या काळात गांधींचे विचारच आपल्याला योग्य मार्ग दाखवू शकतात. गांधी आपल्या आयुष्यातून, विचारातून अन्याया विरोधात मजबूत उभं राहण्याची प्रेरणा येणाऱ्या नवीन पिढयांना सदैव देत राहतील.
आकाश सुलोचना
संपर्क क्र – 09667425060
ई मेल – [email protected]
( लेखक जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, नवी दिल्ली, येथे एम. ए. सोशिओलॉजी द्वितीय वर्षात शिकत आहेत.)