कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
केंद्र सरकारने तपास यंत्रणांचा गैरवापर करत सुरू केलेल्या खोट्या चौकशी व दडपशाहीच्या विरोधात आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीद्वारे केलेल्या कारवाईच्या विरोधात आज दत्त चौक कराड येथे महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील माने, राज्य लेखा समितीचे अध्यक्ष शहाजीराव क्षीरसागर, सातारा जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समिती सभापती, कराड पंचायत समितीचे सभापती प्रणव ताटे, कराड नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष सुभाष पाटील (काका), राष्ट्रीय काँग्रेसचे पदाधिकारी अशोकराव पाटील, मजहर कागदी, शिवसेना ग्राहक मंचाचे उपजिल्हाप्रमुख राजेंद्र माने, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष पोपटराव सांळुखे, संतोष पाटील, पांडुरंग चव्हाण, नंदकुमार बटाणे, कांतीलाल पाटील, लालासाहेब पाटील यावेळी उपस्थित होते.
सुनिल माने म्हणाले, भाजपाकडून महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुडाच्या भावनेतून कारवाई करण्यात येत आहे. राष्ट्रवादी पक्ष हा नवाब मलिक यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. लोकशाहीत हुकुमशाही भाजपा राबवत आहे. राज्यात सत्ता मिळविण्यासाठी भाजपा कुठल्याही थराला जावू लागली आहे. आम्ही सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी, शिवसेना व काॅंग्रेस पक्षाच्यावतीने नवाब मलिकांच्या अटकेचा जाहीर निषेध करतो.