हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला येत्या 29 ते 30 डिसेंबर रोजी ठरणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नागपूर दौऱ्यानंतर दिल्लीमध्ये महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) जागा वाटपा संदर्भात बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये जागा वाटपासंदर्भात दोन फॉर्मुलांवर चर्चा होण्याची दाट शक्यता आहे.
सध्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून लोकसभा जागा लढवण्याची जोरदार तयारी सुरू आहे. तसेच वेगवेगळ्या पक्षांमध्ये जागा वाटपांविषयी देखील फॉर्मुले ठरवले जात आहेत. यामध्येच आता महाविकास आघाडीमध्ये जागावाटप जवळपास निश्चित झाल्याचे म्हटले जात आहे. तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये 15 ते 16 जागा लढवण्याची तयारी सुरू केली आहे.
मुख्य म्हणजे, महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये जागा वाटपाविषयीचा फॉर्म्युला अशा पद्धतीने ठरवला जाऊ शकतो. ज्यात पहिल्या फॉर्मुलामध्ये उद्धव ठाकरे गट 20 जागा काँग्रेस 16 जागा आणि शरद पवार गट 10 जागा, बाळासाहेब आंबेडकर, राजू शेट्टी 2 जागा घेऊ शकतात. तर दुसऱ्या फॉर्म्युलानुसार, उद्धव ठाकरे गट 23 जागा, काँग्रेस 15 जागा, आणि शरद पवार गट 10 जागा घेऊ शकतात.
दरम्यान, महाविकास आघाडी सोबत डाव्या-प्रागतिक पक्षांची देखील आघाडी आहे. यामध्ये समाजवादी पक्ष, शेकाप , डावे पक्ष आहे. तर वंचित बहुजन आघाडीने शिवसेना उद्धव ठाकरे गटासोबत युती केली आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीला जागा वाटप करताना या सर्वांचा विचार करावा लागणार आहे. हा सर्व विचाराचा लवकरच पार पडणाऱ्या बैठकीत केला जाणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.