क्रीडानगरी | स्नेहल मुथा
५० षटकांच्या क्रिकेट सामन्यात २३१ धावांचं लक्ष्य तितकं अवघड नाही. तुलनेने संघ नवखा असेल तर मुळीच नाही. अशा परिस्थितीत आरे त्या “धोनीला रन आऊट करा रे कुणीतरी, नाहीतर मॅच हातातून जायची” असे म्हणणारे पण कमी नव्हते. त्याला फक्त माहित होतं की जोपर्यंत आपण खेळपट्टीवर आहोत, तोपर्यंत सामना हातातून जाऊ शकत नाही. पहिल्या सामन्यात संथ खेळीमुळे टिकाकारांचं लक्ष्य बनलेल्या भारताच्या कूल मॅचफिनिशर धोनीने आज पुन्हा सिद्ध केलं, की कासव आजही सशाला भारी पडणार आहे.
धावांचा पाठलाग करताना तब्बल १०३ ची सरासरी धोनीने गाठली आहे. रिषभ पंत, दिनेश कार्तिक, लोकेश राहुल, वृद्धीमान साहा आणि कधीतरी पार्थिव पटेल धोनीला पर्याय म्हणून पुढे येतील का? हा प्रश्न मागील ४ वर्षांपासून सातत्याने उपस्थित झाला. आणि प्रत्येकवेळीच त्या प्रश्नाला धोनीने संदर्भासहित स्पष्टीकरणही दिलं. मनमानी करणाऱ्या कर्णधारांसारखा धोनी कधीच नव्हता. खेळाडू घडवणं आणि त्यांना प्रोत्साहन देणं एवढंच काम तो पहिल्यापासून करत आला. विराट कोहली, रोहित शर्मा, रविंद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, चेतेश्वर पुजारा हे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या धोनीने घडवलेले हिरे आहेत. आज तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये जागतिक मानांकनात आपण वरच्या स्थानी पोहचलो आहोत, याचं श्रेय जितकं विराट कोहली आणि यंग ब्रिगेडचं आहे, तितकंच ते शांतीत क्रांती करायला शिकवणाऱ्या धोनीचं सुद्धा आहे.
मागील तीन सामन्यातील दोन सामन्यांत नाबाद राहत धोनीने एकूण १९३ धावा फटकवल्या. सिडनीतील पहिल्या सामन्यात ९६ चेंडूत ५१, ऍडलेडच्या दुसऱ्या सामन्यात ५४ चेंडूत ५५ तर मेलबर्नच्या तिसऱ्या सामन्यात ११४ चेंडूत ८७ धावा धोनीने केल्या. या कामगिरीसाठी जवळपास ७ वर्षानंतर धोनीला मालिकावीर पुरस्कार मिळाला. एकूण काय, काळ बदलला, खेळाचं स्वरुप बदललं आणि तसाच बदल धोनीनेही जाणीवपूर्वक स्वतःमध्ये केला. गोलंदाजांवर तुटून पडणारा धोनी, आता संयमी झाला आहे. काहीजण याला खेळ खराब होतोय म्हणतील, किंवा संघातील जागा टिकवण्यासाठीची धडपड म्हणतील. या मालिकेत मात्र कासव गतीने का होईना त्याने तिन्ही सामन्यात विजय मिळवून देण्यासाठी कष्ट घेतले. यंदाचा क्रिकेट विश्वचषक जवळ आला आहे. साधारण १० ते १२ सामने पूर्वतयारीसाठी आहेत. अशावेळी महेंद्रसिंग धोनी फॉर्मात येणं ही प्रतिस्पर्ध्यांसाठी धोक्याची घंटा आहे, असंच आपण म्हणू शकतो. सेहवाग, युवराज, लक्ष्मण, गंभीर यांना या फॉर्मवाचून आपल्या कारकिर्दीची अखेर सामना न खेळताच करावी लागली. अशा परिस्थितीत स्थळ-काळ आणि जबाबदारीचं योग्य भान बाळगणाऱ्या, कासवरूप धोनीची पुढील लढाई पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
इतर महत्वाचे –
हार्दिक पांड्या करणार आता बँकिंग परीक्षेचा अभ्यास ??
सचिन तेंडुलकर यांची मुलगी सारा तेंडुलकर येणार बॉलिवूडमध्ये?
हस्तमैथुन करण्याचे हे आश्चर्यकारक फायदे तुम्हाला माहिती आहेत का ?